पुणे :
महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने महाकवी कालिदास जन्मदिनानिमित्त धारेश्वर विद्या व कला प्रतिष्ठान सभागृहामध्ये महाकवी कालिदास लक्षवेधी पुरस्कार आणि महाकवी कालिदास साहित्य साधना पुरस्कार अनेक मान्यवरांना प्रदान करण्यात आला. त्या मान्यवरांमध्ये अखंड साहित्य सेवा करणारे चतुरस्त्र कवी विनोदजी अष्टुळ यांनी साहित्य सम्राट संस्थेतर्फे शाळा, कॉलेज, सभागृहे, बगीच्या, मंदिरे स्मशानभूमी, लग्न सोहळा, गणेश मंडळे, पदपथावर, दिंडीमध्ये आणि निसर्गरम्य परिसरात वर्षभरातील विविध उपक्रमांद्वारे १८६ कवी संमेलने सातत्याने घेतली आहेत. त्यांनी गेली चौदा वर्ष साहित्य, साहित्यिक आणि साहित्यिक संस्था यांच्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या हातून योग्य प्रकारे साहित्याची सेवा घडत आहे आणि पुढेही घडत राहो. म्हणूनच त्यांना महाकवी कालिदास प्रतिष्ठान तर्फे साहित्य साधना – २०२४ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आत्मयोग गुरु मा. संप्रसाद विनोद, मा.डॉ.प्रा.सुनील कुलकर्णी शिक्षा मंत्रालय भारत सरकार, शिक्षणतज्ञ मा.प्रा.डॉ.न.म.जोशी, प्राचार्य सु.द.वैद्य, डॉ.राजेंद्र झुंजारराव, काकासाहेब चव्हाण, प्रा.महेंद्र ठाकूरदास, ॲड.संध्या गोळे आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भावकवी वि.ग.सातपुते आप्पा. उपस्थित होते. या अप्रतिम कार्यक्रमातील प्रमुख अतिथींचे प्रेरणादायी विचार आणि पुणे शहराच्या विविध भागातून आलेल्या कवींचे कवयित्रींचे बहारदार कवी संमेलन संस्मरणीय ठरले. कवी संमेलनामध्ये रानकवी जगदीप वनशिव, यशवंत देव, उमाकांत आदमाने, बंडा जोशी, शिवाजी उराडे, सुनील खंडेलवाल, प्रिया दामले. सुवर्णा जाधव अशा दिग्गज कवी कवयित्रींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातपुते आप्पांनी तर सूत्रसंचालन ऋचा कर्वे यांनी केले.