You are currently viewing श्रेष्ठ नाते

श्रेष्ठ नाते

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*श्रेष्ठ नाते*

 

नाते,फक्त दोन वर्णांचा एक छोटासा शब्द,परंतु त्यात किती मोठा अर्थ दडून राहिला आहे.

ज्या ठिकाणी प्रेमाची,आपुलकीची, सह्रदयतेची भावना असते तेथेच नाते निर्माण होते आणि तेच नाते श्रेष्ठ असते.

कौटुंबिक जिव्हाळा तर असतोच कारण ज्या कुटुंबात मुलाचा किंवा मुलीचा जन्म होतो त्याचा रक्ताचा संबंध असतो.आई-वडिलांशी असलेले रक्ताचे नाते,आजी, आजोबा,भावंडे,काका,मामा,ही तर नाती आहेतच परंतु प्रत्येकाचे त्याच्या जन्मभूमीशी एक जबाबदारीचे फार मोठे नाते आहे हे विसरता येणार नाही.

जगाच्या पाठीवर कोणी कुठेही जावो,ज्या मातीतून हे मानव रुपी बीज अंकुरले आहे त्या मातीचा सुगंध माणसाच्या श्वासाश्वासात भरलेला आहे हे निश्चित. याचा अनुभव अमेरिकेत कॅलिफोर्नियातील सॅन होजे या गावात नुकत्याच संपन्न झालेल्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या तीन दिवसीय भव्य सोहळ्यामध्ये मला घ्यावयास मिळाला.भारतातील महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून आलेल्या या मंडळींची कर्मभूमी जरी अमेरिका असली तरी त्यांची मातृभूमी मराठीच आहे,या मराठीशी त्यांनी अतिशय दृढ आणि घट्ट प्रेमाचे नाते जपले आहे याचा प्रत्यय क्षणोक्षणी आल्याशिवाय राहत नव्हता.वर्षानुवर्षे स्थायिक असलेल्या कुटुंबांचा त्यांच्या मुलांना आपली संस्कृती किती महान आहे आणि त्याचा अभिमान कसा बाळगावा याचे शिक्षण देण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न होता असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

कुटुंबाव्यतिरिक्त आपल्या आयुष्यात मैत्रीचे श्रेष्ठ नाते आहे,जे आपल्याला जीवनात एक आगळावेगळा आनंद देते आणि *एकमेका सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ*। ही मोठी शिकवण देते. आपल्या भोवती वावरणारी मुकी जनावरे,पशुपक्षी,वृक्षवल्ली, फुले,पाने,नद्या- नाले,संपूर्ण सृष्टीशी

मानवाचे अत्यंत जवळचे मैत्र आहे. बैल हा तर कृषीवलांचा निकटचा सखा!त्याच्याविना शेती कशी होणार? गाई म्हशी नसत्या तर दूध कोणी दिले असते? नद्यांचा उगम झाला नसता तर पाण्या वाचून जगणे शक्य होते का? वृक्षवल्ली नसत्या तर श्वासच थांबला असता.या नात्यांना काय नाव द्यावे?

ज्या मायभूमीत जन्म झाला, तिच्यावरील प्रेमामुळेच तिचे रक्षण करण्यासाठी या भूमीची लेकरे सीमेवर थंडी,वारा,ऊन,पाऊस कशाची तमा न बाळगता स्वतःचे कुटुंब सोडून अविरत सज्ज आहेत. हेच राष्ट्राशी असलेले नाते आणि कृतकृत्यता!

पृथ्वी,आप,तेज,अग्नी,वायु आणि आकाश या पंचतत्वांनी हा मानव देह मिळाला आहे. याचाच अर्थ दृश्य सृष्टीतील प्रत्येक तत्त्वाशी आपले जवळचे नाते आहे, किंबहुना त्या वाचून आपले जगणेच असंभव आहे. अशा या सृष्टीचा निर्माता,स्थिती- लयकर्ता भगवंत, परमतत्व, त्याचे व आपले नाते अक्षर आहे,अविनाशी आहे,म्हणूनच जन्माला येणारा प्रत्येक प्राणी हा अखेर पंचतत्वात विलीन होतो.

अशी ही आयुष्यातील विविध श्रेष्ठ नाती असली तरी ज्या मातीतून ही सर्व नाती जन्मली त्या मायभूमीशी,आपल्या काळ्या आईशी असलेले अतूट नाते हे श्रेष्ठतम आहे हे मात्र नक्की!

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

प्रतिक्रिया व्यक्त करा