*सावंतवाडी शहरातील अनेक रस्ते जलमय, बाजारपेठेत रस्त्यावर पाणी*
सावंतवाडी:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून सावंतवाडीत पावसाने कहर केला आहे. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असून रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. सावंतवाडी बाजारपेठेत जयप्रकाश चौक, चंदू भुवन परिसरात रस्त्यावर पाणी साचले आहे. रविवार असल्याने बाजारपेठेत वर्दळ कमी आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील आत्मेश्वर मंदिर मागील रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले असून पाण्याचा प्रवाह जोरदार वाहत आहे. माठेवाडा, वैश्यवाडा परिसरातील रस्त्यांवर देखील पाणी जोरात वाहत आहे. शहरातील जगन्नाथ राव भोसले उद्यानाच्या मागील रस्त्यावर दीड फुटांपेक्षा जास्त पाणी साचल्याने सालईवाडा भागातील लोकांचे घरी परतण्याचे मार्ग बंद झाल्याने शहरातील पालिकेने नव्याने केलेल्या डांबरी रस्त्यावर पाणी साचल्याने पालिकेच्या कामांवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे सावंतवाडी शहर जलमय झाल्याचे दिसून येते. भारतीय हवामान खात्याने देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.