*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री लेखिका सौ स्मिता रेखडे लिखित कवी कालिदास दिनानिमित्त अप्रतिम लेख*
🙏🌹 आषाढस्य प्रथम दिवसे 🌹🙏
🙏🌹 महाकवी कालिदास दिन 🌹🙏
“दूरदूर नभापार, डोंगराच्या माथ्यावर
निळेनिळे गारगार, पावसाचे घरदार
अश्या पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे,
उमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे,
जशी ओली हुरहुर थरारते रान,
तसे नाव तरारावे माझे,तुझ्या मनभर.”
सरीवर सरी, सरीवर सरी.
कवि संदीप खरे
प्रेम भावना ही विश्वव्यापी आहे. पावसाची चाहूल ,तो मृदगंध ,रखरखीत झालेल्या सृष्टीला नवचैतन्य बहाल करणारा सृजन महोत्सव ,तालात पडणारे टपोरे थेंब ,उनाड मुलाप्रमाणे अवखळ वाहणारा वारा ,विद्युतलतेसह बरसणा-या अमृतधारा. सृष्टी सुजलाम सुफलाम होऊन चित्तवृत्ती बहरणे असा हा वर्षांॠतु प्रारंभ. प्रेमीजनांना मनस्वी हवाहवासा वाटणारा ऋतु. पावसाळा आणि कविंच्या प्रतिभेचा बहर हे समीकरण युगानुयुगे चालत आहे.
‘घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा’ .शेतकरी हा चातकासारखी पावसाची वाट बघत हुलकावणी देणा-या लहरी निसर्गाच्या स्वागतास उत्सुक. धरणीमातेतुन प्रसन्नतेने हळुच डोकावणारी इवलीशी कोंब आणि ते बघुन तृप्तीने सावळ्या विठुराया च्य चरणी नतमस्तक होण्यास पायी वारी करण्यास आतुरलेली त्यांची मन ह्याचा सोहळा आषाढात साजरा होतो.
आषाढ मासारंभ कवी कालिदास यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक धनाचा ठेवा म्हणून साजरा होतो. त्यांची अलौकिक साहित्य कलाकृती म्हणजे फुलांच्या उमलण्याचा डौल,नजाकत .त्यातील लालित्य मोहर बहरावा तसा फुलला आहे. रघुवंश, कुमारसंभव, मालविकाग्नीमित्र, शाकुंतल अश्या अनेक अजरामर संस्कृत काव्याची श्रीमंती ,प्रगल्भ साहित्य झरा पुढील पिढीला पाझरतो. विद्यापीठ अभ्यासक्रमात याचा समावेश आहे .ह्या दिनी यक्षपत्नीची मनोव्यथा college मध्ये साकारली होती. त्याचे स्मरण झाले.
अलकानगरीचा अधिपती धनराज कुबेर याने सेवक यक्षाकडुन चुक घडल्याने एक वर्ष दुर राहण्यास सांगीतले. एकांतवासात यक्ष इतका प्रेमविव्हळ व कृश झाला होता की त्याच्या हातातुन कंकण गळुन पडले .रामगिरी पर्वतावर आषाढाच्या पहिल्या दिवशी काळ्या ढगांच्या मधुन गर्जना करित मुक्त विहार करणा-या मेघाला बघून यक्षाला प्रियेची आठवण होऊन संदेश देण्यासाठी विरहिणी स्फुरते.’मेघदूत’.
प्रियतमेच्या विरहात व्याकुळ यक्ष मेघाला दुत बनवुन केवळ संदेश नाही तर अलकानगरीचा मार्ग नगर,नदी, पर्वत, निसर्ग यांचे रमणीय सृष्टी वर्णन करून विरहातील शृंगाररस,प्रेमिकांच्या भावनांचा चकित करणारा प्रतिभा विलास ,कल्पनेची झेप ह्यातुन रम्य काव्य निर्मीती झाली . प्रत्येक श्लोक प्रतिभेचा अविष्कार तर आहेच व्यक्तिचित्रण पण यथार्थ आहे. मेघांची स्तुती पण आहे.
‘आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानु,
वप्रक्रीडापरिणत गजप्रेक्षणीयं ददर्श ,
‘आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला,
टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातुर गज जणु ठाकला.
प्रेम काव्याचे समर्पक वर्णन ,रसिकांना आनंद देणा-या कवी कालिदासाच्यां सर्व कलाकृती म्हणजे मुकुटमणि! महाकवी कालिदास यांच्या अद्भुत रचनेचा अनेक भाषेत भाषांतर झाले आहे .प्रेम व्यक्त करण्यासाठी आजकाल Valentine’s day व इतर days साजरे करावे लागतात. आषाढात नवविवाहिता सणांच्या निमित्त्याने माहेरवाशीणी होतात व सासरी पति यक्षासारखा विरहाने झुरतो .शांताबाई शेळके व इतर लेखकानी नी केलेल्या अनुवादातुन काव्यांचा आस्वाद घेता येतो.
‘रुसलेली तु,धातुरसांनी चित्र शिळेवर असे रेखितो !
चरणी तुझीया नत झालेल्या मला,सखी,मी र॔गवु बघतो ! तोच आसवे नयनी दाटती, दृष्टी माझी होते धुसर,चित्रातील ही मिलन आपुले सहन होईना , दैवा निष्ठुर !!
चित्रात देखील तुझी माझी भेट होऊ नये. चक्रवाक पक्षिणी प्रमाणे ती एकटी पडली आहे. पत्नीच्या विरहाने विदीर्ण ह्रदयपटलावरील वेदनेचा अविष्कार असे हे महाकाव्य ‘मेघदूत.’
शब्दप्रभुत्व,वाक्यचातुर्य,बुध्दीमत्ता याचां संगम. असे म्हणतात की उत्कृष्ट महान कवींची गणना करतांना कालिदासांचे नाव घेऊन एक बोट करंगळी पासुन सुरवात केली. दुसरा कोणीही तोलामोलाचा कवी सापडला नाही म्हणून दुसरे बोट उचलल्या गेले नाही ती अनामिका च राहिली. अश्या श्रेष्ठ महाकुलुगुरु कवी कालिदासांना प्रणाम.🙏🙏
सौ.स्मिता श्रीकांत रेखडे.नागपूर