नेरूर येथे बंद घर फोडले, ५ लाखाचा मुद्देमाल लंपास…
कुडाळ
नेरूर-आदर्शनगर येथील रूपेश घाडी यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने ३ लाखाचे सोन्याचे दागिने व २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम मिळून सुमारे ५ लाख ५० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेरूर आदर्शनगर येथील रूपेश घाडी हे आपल्या कामाच्या ठिकाणी गेले होते. तर घरातील तिघेही शेती कामासाठी घर बंद करून बाहेर गेले होते. तर दोन्ही मुले शाळेत गेली होती. त्यामुळे घरात कोणीच नसल्याची संधी साधत अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. घराचा मागील दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला. यावेळी कपाटावर ठेवलेल्या चाव्या घेत कपाट उघडले. व कपाटाच्या एका भागात ठेवलेले दागिने अगदी सहजपणे हाती लागले. तर दुसऱ्या भागाची चावी या चोरट्याला न मिळाल्यामुळे त्याने कोणत्या तरी धारधार हत्याराने या कपाटाचे लॉकर तोडले. व या ठिकाणी घाडी यांनी ठेवलेले २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम मिळाली व चोरट्याने मागील दरवाजातूनच पळ काढला. दुपारी १२.४५ वा शेतकामावरून घरी आल्यावर मुख्य दरवाजा उघडून आता प्रवेश केल्यावर किचनमध्ये चाव्या पडलेल्या दिसल्या. आत मध्ये गेल्यावर कपाटही उघडे दिसले. कपाटातील सामान अस्ताव्यस्त तर इतर लॉकर पेचलेले आढळले. तसेच दागिन्यांचे बॉक्सही पडलेले आढळले. यावेळी तपासल्यावर घरातील दागिने व रोख रक्कम गायब झालेली आढळली. दागिन्यांमध्ये १ सुमारे दोन तोळ्याचे मंगळसूत्र, एक सोन्याचा हार, ४ सोन्याच्या चैनी , २ अंगठ्या, २ कानातील जोड असा तीन लाखांचे दागिने चोरीस गेले. तर २ लाख ५० हजार रोख रक्कम चोरीस गेली. रूपेश घाडी याच्या घराच्या बाजुला त्यांच्या भावाचे घर आहे व इतर घरे या दोन घरांपासून थोडी दूर आहेत. घाडी यांच्या भावाचे घरही बंद होते. त्यामुळे काहीशी निर्जनवस्ती व आजुबाजुला कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने आरामात घरत चोरी केली. यानंतर पोलीसांनी श्वान पथकामार्फत तपासणी केली असता श्वास पथक नेरूर श्री देव कलेश्वर मंदिरापर्यंत येवून घुटमळले. तेथून चोरट्यानी गाडीने पळ काढला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.