ओरोस :
कणकवली तालुक्यातील लोरे नं.१ येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम केलेल्या गांगेश्वर ते सोनारवाडी या रस्त्यावर सरपंच अजय रावराणे यांनी रस्त्यावर दुतर्फा चिरेबंदी पत्राचे पक्के छप्पर बांधून केलेल्या अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण केला. कारवाई न झाल्याने आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार जयंत पाटील विधानसभा अधिवेशनात लक्ष वेधनार असल्याचे राष्ट्रवादी काँगेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले.
याबाबत पालकमंत्री, जि. प. सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता कुडाळ, तसेच तहसीलदार, गट विकास अधिकारी कणकवली यांना या प्रकाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची वारंवार मागणी तक्रार करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले. कोणतीही कारवाई न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय समोर साखळी उपोषण करावे लागले.
यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी जिल्हाधिकारी तावडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची भेट घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली. यावर उपोषण कर्त्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी यांनी दुपारी भेटून यासंदर्भात उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच कार्यकारी अभियंता यांना पाठवून उपोषणकर्त्यांच्या उपस्थितीत रस्त्याची पाहणी करून वस्तुस्थिती अहवाल घेऊन कारवाई केली जाईल असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
तसेच कुठूनही हे अतिक्रमण काढावे आणि वाहतूक पूर्ववत सुरू व्हावी या करिता विधानसभेत येत्या शुक्रवार शनिवार पर्यंत आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार जयंत पाटील, बाळासाहेब पाटील हा अतिक्रमणाचा लक्षवेधी प्रश्न विषय मांडणार आहेत, असे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले