सावंतवाडी :
आम्ही युतीधर्माशी बांधील आहोत. त्यामुळेच कोणी उपरा काहीही बोलला तरी लक्ष देत नाही. जनतेने त्यांना दोन वेळा जागा दाखविली आहे. तेलींनी हिंमत असेल तर भाजप पक्षातर्फे महायुतीतून बोलतो, युती धर्म पाळत नाही हे जाहीर करावे असं आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी त्यांना दिले. तर येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत दीपक केसरकर हेच महायुतीचे उमेदवार असणार, तेलींनी विनाकारण महायुतीत मिठाचा खडा टाकू नये असा टोला श्री. दळवी यांनी हाणला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, लोकसभेत खा.नारायण राणे, पदवीधरमध्ये निरंजन डावखरे यांच्या निवडणूकीत प्रामाणिक काम आम्ही केलं. त्यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यामुळे युती धर्म राजन तेलींनी पाळावा. केसरकरांचे महत्त्व महायुतीने मान्य केले आहे. खासदार नारायण राणे यांनी ते मान्य करुन अधोरेखितही केले आहे. हे राजन तेली यांनी विसरु नये असा टोला हाणला. तसेच केंद्रात आणि राज्यातही महायुतीचे सरकार आहे. सर्व वरिष्ठ आणि पदाधिकारी एकजुटीने काम करत असताना राजन तेली अशी भुमिका का ? मांडत आहेत हे सर्वांना कळतच आहे. त्यांचा हेतू जनतेला माहित आहे. सावंतवाडी, वेंगुर्ला दोडामार्गातील जनता ते ओळखून आहे. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा कमीपणा दाखवून तेलींची प्रतिष्ठा वाढणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत दीपक केसरकर हेच महायुतीचे उमेदवार असणार आहेत. सावंतवाडी मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने भावी आमदारही दीपक केसरकर हेच असणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे राजन तेली यांनी खोट्या प्रसिद्धीसाठी व लोकांची दिशाभूल करण्यासाठी खोटी टीका करु नये. तसेच महायुतीमध्ये अकारण मिठाचा खडा टाकू नये, महायुतीचा धर्म पाळावा असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी दिला आहे.
दरम्यान, आम्ही उत्तर द्यायला सक्षम आहोत. परंतु, युती धर्माच बंधन आहे. टीका न थांबल्यास तेलींना जशास तसं उत्तर देऊ असा इशारा विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी दिला. महिला जिल्हाप्रमुख अँड.निता कविटकर म्हणाल्या, भाजप आणि शिवसेना पक्ष महायुतीत आहेत. राजन तेली स्वार्थासाठी दीपक केसरकर यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी भाजप म्हणून आपण टीका करत नाही हे जाहीर करावे. त्यानंतर जशास तसे उत्तर देऊ. चौथ्यांदा ही उमेदवारी आम्हाला मिळणार आहे. तेलींनी विनाकारण महायुतीत फूट पाडू नये असं मत तालुकाप्रमुख बबन राणे यांनी व्यक्त केले. तर वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितिन मांजरेकर म्हणाले, तेली हे राज्य सरकारच्या विरोधात आहेत का ? हे त्यांनी जाहीर करावे. नंतरच टीका करावी, दीपक केसरकरांवरील टीका सहन केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख अँड. निता कविटकर, विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितिन मांजरेकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, सुनिल मोरजकर आदी उपस्थित होते.