You are currently viewing माझे गाव कापडणे…

माझे गाव कापडणे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*२४) माझे गाव कापडणे…*

 

मंडळी, तुम्हाला वाटत असेल मला बालपण फार आठवते, नाही हो, मला खूप खंत आहे की

पहिली पासून ते पाचवी सहावी पर्यंतच्या साऱ्या घटना नाही आठवत हो मला. खूप काही

विस्मरणात गेले आहे, थोडे फार आठवते आहे

तेच तुमच्यापुढे मी मांडते आहे. सातवीच्या साऱ्याच घटना मात्र ठळकपणे आठवतात.

बघा, काळ असा होता अडाणीपणाचा. शाळेत

गेलेच पाहिजे असे न वाटण्याचा. आया शेतात जात, मोठ्या मुलीवर नंतरची एकदोन पोरे सोपवून जात. त्या पोरीने बिचारीने शाळेत नाव

दाखल केले असेल तरी पोराला भरवायचे, झोळीत टाकायचे. ते पोर झोपलं की घरातील

उर्वरीत कामे करायची. तिचा दिवस त्यातच जाई. शाळाच नाही तर काय अभ्यास करणार ती! बिचारी दिवसभर आईने मांडलेला पसारा

सांभाळणार ती. कसली शाळा न् कसलं काय?

हीच परिस्थिती घरोघर होती. अपवादानेच मुली शाळेत जात असत. हातावर पोट भरणारे हे लोक करणार तरी काय हो? आपली दु:खे ती कुणाला सांगणार? सारे एकाच नावेतील प्रवासी हो, सारेच अगतिक!

 

दिवसभर शेतात राबायचे. त्याआधी सकाळी

लवकर उठून रोजची धुणी भांडी,एवढ्या लोकांच्या भाकरी बडवायच्या. नवऱ्याला भाकर बांधून द्यायची, मग आपली भाकर फडक्यात बांधायची, मुलांना टोपलीत भाकरी

उरली पाहिजे याची काळजी घ्यायची व धावपळ करत दहा साडेदहाला तुटकी चप्पल

ओढत शेताचा रस्ता धरत रोजगाराला भिडायचे. उशिर झाला की शेतकरी बोंबलणार.. “ ओ साईत्रा, कितला उशिर करी

दिधा बैन? आसं करशी ते कालदिन येऊ नको बरं! “झालं, रोजगाराला खाडा पडणार. कसं परवडेल हो त्यांना?

शेतकरीही बरोबरच असे.एकतर शेतावर पोहोचायला उशिर लागतो. चालत जायचे

तीन ते चार मैल. मग कामाला भिडायचे. त्याला

कसे परवडणार हो? मग तो बोलणारंच ना?

आणि एकदा की लेटकमर शिक्का बसला की

कुणी कामावर घेत नाही. केवढी जीवाची ओढाताण हो बायकांची?घरादारी तेच. म्हणून

मी म्हणते, बायकांचा जन्मच वाईट. कुठेच सुख नाही त्यांच्या नशिबात.दिवसभर निंदणी कर,कपाशी वेच,कांदे खांड (शेतातच कांदे विळ्याने पात अलग करून ढीग करायचा

याला कांदे खांडणे असे म्हणतात)अशी कामे करून

संध्याकाळचे घरचे वेध लागत तर दिसे की,

घरी गेल्यावर चुल पेटवायला सरपण नाही. मग वणवण फिरत जळण गोळा करायचे, त्याची मोळी बांधायची, ती डोक्यावर चुंभळ

ठेवून वर लांबलचक ती मोळी ठेवायची व पुन्हा

फाटकी चप्पल सावरत घरचा रस्ता धरत

धप्पकन मोळी अंगणात टाकायची व हुश्श

करत घरात शिरायचे तो दिवसभराची घरात असलेली पोरे अंगाला बिलगत.

 

हातपाय धुवत पोरांना गोंजारायचे नि पुन्हा

भाकरी बडवायला चूल पेटवायची नि ओल्या

सरपणाच्या धुरात डोळे गाळायचे. हा दिनक्रम

कधीच बदलत नसे.मग नवराही कामावरून घरी थकूनभागून येणार, त्याला चटणी भाकर वाढायची. आपण दोनघास पोटात घालून अंथरूणावर अंग टाकताच, थकल्याभागल्या

जीवाला मेल्यासारखी झोप येणार, ते कोंबड्याने बांग दिल्यावरंच उठायचे.उन्हातान्हात वादळवाऱ्यात पाय कायम

भेगाळलेले, खरबरीत, टोचणाऱ्या टाचा. लक्ष

द्यायला वेळ कुणाला आहे इथे! पोटाची खळगी माणसाला किती राबवतात हे मी लहानपणी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे म्हणून मला त्याची चांगलीच जाणीव आहे.

शहरातल्या लोकांना हे जीवन समजणे केवळ

अशक्य आहे, ते कळण्यासाठी ते माझ्यासारखे जवळूनच पहायला हवे.

 

माझी एक काकू मात्र फार हुशार होती. रोज शेतातून घरी आली की तडक आमच्या घरी येणार. हातपाय धुवून तडक आमच्या सामानाच्या खोलीत आईचा कुंकू तेल फणीचा

लाकडी डबा असे, त्यातून खोबरेल तेलाची वाटी काढली की हिचे हातपायांना तेल चोळणे सुरू व्हायचे. मला तेव्हा कळत नव्हते पण नंतर आता लक्षात आले की दररोज एवढ्या तेलाचा खर्च ती

कसा करणार? आमच्या घरातले तेल चोपडून

तो ती वाचवायची एवढेच. तशी ती जेवायखायलाही आमच्याचकडे असायची.

अगदी दररोज नेमाने पायाला हातांना चेहऱ्याला ती तेल लावत असतांना आमच्या

घरातील कुणीही कधीही, आईनेही टोकले नाही.आता इतक्या वर्षांनी ते दृश्य माझ्या नजरेसमोर आले आणि म्हणून मी ते आता लिहिले इतकेच.मी लग्नानंतरही जेव्हा जेव्हा

कापडण्याला गेले तेव्हाही तिच्या या कार्यक्रमात कधी खंड पडलेला मला दिसला

नाही. त्यामुळे मुळात देखणी असलेली तिची

त्वचा शेतात राबूनही कायम तुकतुकीत राहिली.

निदान पायांना तेल लावायला तिला आमचे घर तरी होते,पण बाकीच्यांचे भेगाळलेले पाय कुणीच पाहिले नाहीत. बिचारे वेदना सोसत

काटकसर करत पुढच्या पिढीसाठी राबत राहिले ज्याची कुठेही नोंद झाली नाही, ना कुणी त्यांची दखल घेतली.

 

ती रोजगाराला जाऊन पैसे साठवायची. आश्चर्य म्हणजे शाळेत न गेलेली माझी ही काकू एक दिवस तडक माझ्या नाशिकच्या घराच्या दारात येऊन उभी राहिली तेव्हा तिच्या हिंमतीचे मला फारच कौतुक वाटले व मी आश्चर्याने थक्कही झाले. केवळ विचारत विचारत ही बाई नाशिकला व सी बी एसहून पायी माझ्या घरी पोहोचली तेव्हा हसावे की रडावे तेच मला कळेना.” अग, कशी पोहोचलीस बाई? तू इथे कशी? मी अवाक्!”केवढी हिंमत!

लिहिता वाचता येत नाही तरी कापडण्याहून

थेट नाशिकला माझे घर गाठणे, मानले पाहिजे

तिला.आता आठवत नाही पण २/४ दिवस तिचा मुक्काम होता. तिचा व्यवस्थित पाहुणचार मी केला. ही गोष्ट ७३/७४ सालची

असावी. नंतर आली तशी ती गेली. म्हणून मी

फार चिंता केली नाही.

 

कारण,

तेव्हा आमचाच जीवनाशी झगडा चालू होता, सुखी होण्यासाठी. मी बी. एड् व नंतर बाहेरून घरीच अभ्यास करत एम ए ची परीक्षा देत होते. फक्त दोन खोल्यांचे आमचे भाड्याचे घर होते यावरून तुम्हाला कल्पना येईल आमच्या परिस्थितीची. माझा मोठा मुलगा तेव्हा फक्त चार वर्षांचा होता.सुखाच्या कल्पनाच फार

साध्या होत्या त्यामुळे आनंदात होतो.भाड्याचे का होईना घर, नवऱ्याला नोकरी एक मुलगा,

आणखी काय पाहिजे? नवऱ्याला जायला यायला एक सायकल होती. आहे ना मज्जा!

भविष्यात माझ्या दारात गाडी असेल हे कुणाला माहित होते? लढत राहिलो, यश मिळत राहिलं, पुढे पुढे चालत इथपर्यंत आलो.

नि लेखणी हातात येऊन तुम्हाला सांगितले सुद्धा! कष्टाला फळ येतेच हो, लक्षात ठेवा.

आपोआप कोणतेच फळ तोंडात पडत नाही

हे ही लक्षात ठेवा.आता महालात जन्म घेणे

आपल्या हातात आहे का सांगा? वडीलांनी

एफ वाय बी ए पर्यंत आणून सोडले होते म्हणून

तर पुढचा प्रवास होऊ शकला ना? नाहीतर

अवघड झाले असते पहा.त्यांनी भौतिक श्रीमंती पेक्षा आम्हा चारही भावडांना शिकवून

ज्ञानाची संपत्ती बहाल केल्यामुळेच नंतर मी शिक्षण पूर्ण करून नोकरीत स्थिरावले.हजारो

विद्यार्थी तर घडवलेच पण माझ्या दोन्ही मुलांना मी व माझा नवरा यांनी घरीही शिकवून

दोघांना मी चांगल्या गुणांच्या बळावर डॅाक्टर

करू शकलो. आधी सरस्वतीची आराधना करावी, लक्ष्मीला साथ द्यायला यावेच लागते.

 

आजही मला कापडण्याचे ते दिवस लख्ख

आठवतात. उजाडल्याबरोबर सालदाराचे येणे,

बैलगोठा आवरून पुंजा(केरकचरा)भरून उकिरड्यावर नेऊन टाकणे, पाण्याची टिपाडी

बैलगाडीत ठेवून नदीवरून (हाय) विहीरीवरून

ती भरून आणणे व घरातले माठ वगैरे हौद यात ते पाणी साठवणे अशी त्याची रोज सकाळ सुरू होत असे ती वर्षानुवर्षे.मग अंगण

झाडायचे. शेणगोळा व बादली पाण्याने भरून

ठेवायची सडा टाकण्यासाठी. नंतर बैलगाडीला

बैल बांधून बैलांना पाणी दाखवायचे. बैल पोटभर पाणी प्यायले की मग घरी जाऊन न्यहारी बांधून आणायची व बैल जुंपून शेताची वाट धरायची.पूर्वी विहीर मोट नाडा होते. बटन

दाबले की पाणी पडत नसे.बांधावर बसून न्यहारी करायची नि शेताला पाणी भरण्यासाठी मोट जोडायची, बैल जुंपायचे नि

मध्ये लाकडाची पाटी असे दोरखंडावर बसायला त्यावर बुड टेकवत मस्त है रं है रं

करत ललकारी मारत शेताला पाणी पाजायचे

ते १/२ वाजे पर्यंत.तेवढ्यात घरून कोणीतरी

भाकर पोहोचवत असे ती आली की, विहीरीच्याकडेला लिंबाच्या हिर्व्यागार सावलीत बसून कांदा भाकर भाजी लोणच्याची कोरडी फोड असे जेवायचे. तो पर्यंत बैलही चारा खाऊन रवंथ करत बसलेले

असत.थोडी विश्रांती घेऊन मोट जोडायची ती

पुन्हा संध्याकाळ होईपर्यंत. दिवस मावळतांना

मोट सोडायची व बैल जुंपून बिगी बिगी घरचा

रस्ता धरायचा. बैलांना इतका सराव असे की

त्यांना काही न सांगता ते थेट दारात येऊन उभे रहात असत.

मग अक्का त्यांना कणीकोंडा भाकरी

तगारीत त्यांच्यापुढे ठेवताच मान हलवत गळ्यातील घंटांचा आवाज करत ते आनंदाने

खाऊ लागत. मंडळी, मोठे खडतर आहे हो कृषीजीवन, तेव्हा ही व आता ही. परिस्थितीनुसार बदल झाले तरी शेतकऱ्याला

कोणी वाली नाही व त्याचे दैन्य काही संपत नाही.माझ्या वडीलांचीही धडपड तेव्हा समजत

नसली तरी आता आठवून जीव तुटतो. आधाराच्या खांबालाही आधाराची, सांत्वनाची

गरज असते हे कुठे कळत होते तेव्हा? आता कळून उपयोग नाही.असो.

 

बरंय् मंडळी, राम राम.

 

जयहिंद जय महाराष्ट्र.

 

आपलीच,

 

प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा