पुणे :
आपल्या मराठी भाषेतील वाङ्मय हे संत, पंत आणि तंत या प्रकारातून निर्माण झाले आहे. साहित्याची सुरुवात सर्वसामान्य माणसांच्या, महिलांच्या ओवी काव्य प्रकाराला घेऊनच अखंड बहरत राहिले आहे. जात्यावरची ओवी, धनगरी ओवी, झोपाळ्यावरची ओवी, शेतातील ओवी, महानुभवीय ओवी, महदंबीची ओवी, ज्ञानेशाची ओवी, एकनाथाची ओवी. समचरणी ओवी आणि विषमचरणी ओवी अशा साडेतीन, चार, पाच चरणांच्या ओव्या प्रसिद्ध आहेत. अशा ओव्यांच्या मालिकातूनच जीवनाला अर्थ देणारे अभंग निर्मिती झाली आहे. असे मत साहित्य सम्राट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले.
साहित्य सम्राटचे दरवर्षीप्रमाणे वारीमध्ये १८६ वे कवी संमेलन हडपसर गाडीतळ येथे आयोजित करण्यात आले होते. आळंदी ते पंढरपूर पायी चालणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या रथापुढील दिंडीच्या मुक्कामी भक्तीपूर्ण वातावरणात ह. भ. प. सुभाष बडधे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी वारी म्हणजे वारणे, दूर करणे. प्रत्येक वारकऱ्यांनी आपल्या मोह माया संसाराला दूर सारून विठू माऊलीच्या दर्शनातील स्वर्ग सुखाचा आनंद घेतला पाहिजे. असे अध्यक्षीय भाषणात बडधे यांनी विचार प्रकट केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात हरिपाठ संकीर्तन सोहळा सादर केला. त्यानंतर वारकरी बंधूं भगिनींच्याच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह १८६ व्या कविसंमेलनास सुरुवात झाली. समाजसेवक माणिक आवळेसरांनी कवी कवयित्रींचा परिचय करून दिला. या भक्तीरसामध्ये चिंब होण्यासाठी कवी.सुभाष बडदे महाराज, प्रतिभा मगर, सुजाता नाणेकर, कांचन मून, किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, जगदीप वनशिव, श्रीकांत वाघ, सिताराम नरके, विनोद अष्टुळ, भारत मस्तुद इत्यादी कवी कवयित्रींनी आपल्या बहारदार भक्ती रसातील कवितांनी विठू माऊलींच्या भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी पार पाडले. तर दिंडी चालक ह.भ.प भारत महाराज घोगरे यांनी सर्वांचे आभार मानले.