पुणे:
पुण्यातील एका लोकार्पण कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेचा ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण सोहळा पार पडला. या व्यासपीठावर मान्यवरांनी भाषणे केली. यातील देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाने सा-यांचे विशेष लक्ष वेधले. हा प्रकल्प पुणेकरांच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे या मुद्द्यावर ते बोलत होते. याच मुद्यांवर बोलताना त्यांनी एक मजेशीर वक्तव्य केले. अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या किंवा मी तुमच्या घरी येतो, असे फडणवीस म्हणाले आणि कार्यक्रमात तुफान हशा पिकला.
विस्तारित होत असलेल्या पुण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. पण पुणेकरांना या पाणी पुरवठा लोकार्पण सोहळ्याची जितकी उत्कंठा नसेल, त्यापेक्षा जास्त उत्कंठा मीडियातील लोकांना होती. १ जानेवारीला अजितदादा-देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर एकत्र येणार हीच बातमी गेले दोन-तीन दिवस मीडियामध्ये दिसत होती. आम्ही एकाच मंचावर येणार म्हणजे काय़़. आम्ही कुस्ती खेळणार होतो की गाणे गाणार होतो? असं काहीही नसताना मीडियाने दोन दिवस आपल्याच बातम्या दाखवल्या. अजितदादा, मला असे वाटते की जर दोन-तीन दिवसांच्या बातम्या द्यायच्या असतील तर एकतर तुम्ही मला चहाला तुमच्या घरी बोलवा किंवा तुम्ही माझ्या घरी चहाला या. म्हणजे दोन-तीन दिवस आपल्या बातम्या चालत राहतात अशी मजेशीर शाब्दिक फटकेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली.