*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*
*गुड न्यूज*
आपल्याकडच्या जनतेला हिंदी पिक्चर मधल्या नट नट्यांचं भारीच आकर्षण असतं. त्यांची एक झलक बघायला सामान्य लोकांच्या झुंडीच्या झुंडी लोटतात. त्यांच्या बंगल्यांच्या बाहेर सकाळपासून रात्रीपर्यंत ते बघायला मिळावेत म्हणून येऊन बसणारी रिकामी जनता सुद्धा आपल्याकडे प्रचंड प्रमाणात आहे. अशीच सध्या एक सेलिब्रिटी गरोदर आहे म्हणून तिला बघण्यासाठी, कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी, बाईट घेण्यासाठी पापाराझी नुसते वेडे झालेत. यालाच ग्लॅमर म्हणतात. कोणी शिंकले तरी त्याची बातमी होते आणि कोणी रस्त्यात मरून पडलं तरी त्याकडे दुर्लक्ष होतं. असो.
यामध्ये माझं लक्ष खेचून घेतलं ते तिच्या गरोदरपणानं. हा जवळजवळ प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला अतिशय सुंदर, महत्त्वाचा आणि तितकाच आयुष्य पूर्णांशाने बदलून टाकणारा क्षण. ही बातमी येते ,म्हणजे गुड न्यूज येते तेव्हा सर्व घरदार आनंदाच्या झुल्यावर झुलत असतं.पण जे नवरा बायको आई बाबा होणार असतात ते मात्र काहीशा गोंधळलेल्या, अनिश्चित अशा मनःस्थितीत असतात.आपल्याला नक्की आनंद तर झालाय पण ही जबाबदारी पेलवेल की नाही अशा संभ्रमात ते असतात. तरीही एका अनामिक सुखाच्या चाहुलीने एकीकडे छानही वाटत असतं.हे दडपण फक्त स्त्रीवरच असतं असं काही नाही.पुरूषही आयुष्याच्या या टप्प्यावर एका वेगळ्या स्थित्यंतरातूनच जात असतो. तोही पहिल्यांदाच बाबा होणार असतो. बायकोची काळजी वाटत राहते, तिच्या सतत बदलणाऱ्या मूडला समजून घेणं असतं, दवाखान्यात चकरा चालू असतातच… आणि या सगळ्यात येणारे जाणारे एकीकडे, ‘तुला काय कळतंय’ म्हणून उगाचच दटावत राहतात ते वेगळंच. अन् दुसरीकडे लांब रहावं म्हटलं तर ‘याला काय पडलेलंच नाही’ अशी मुक्ताफळे उधळली जातात. एकंदरीतच हे प्रकरण रंजक होत चाललेलं असतं.
पण खरी परीक्षा असते ती त्या स्त्रीची. नोकरी व्यवसाय करणारी असो किंवा घर सांभाळणारी असो, हा निर्णय दोघांच्या संमतीने घेतलेला असो अगर घ्यायला भाग पडलेला असो…निसर्गानं तिच्याकडे अतिशय जबाबदारीने हे काम सोपवले आहे.आपल्या आतमध्ये , शरीरात एक इवलासा जीव तयार झालाय, त्याच्या नाडीचे ठोके डॉक्टरनं ऐकवलेत, त्याची हालचाल स्क्रीनवर पाहता येतेय… हे सगळं अचंबित करणार असतं. त्याच्यामुळे आपल्या पोटाचा घेर वाढतोय,वजन वाढतय, सगळं अंग हळूहळू सुजल्यासारखं दिसतंय…या अनपेक्षित बदलांच्या जंजाळात तिचं मन सैरभैर होत असतं. आपण आता बेढब, फुगलेल्या तंबू सारख्या होणार,डायपर्स आणि वाईप्समधेच दिवसाचे २४ तास डोकं घालावं लागणार,डोळ्याखाली काळी वर्तुळ येणार..असे विचार सारखे मनात येत असतात. शिवाय पहिलटकरीण म्हटल्यावर सल्ले देणाऱ्या बायका काय कमी असतात का? इतके सारे डूज अँन्ड डोन्ट्स मिनटामिनटाला कानावर आदळत असतात की त्यात त्या बिचारीला नक्की काय करायचं हे शेवटपर्यंत कळत नाही.
एरवी मनाने,विचाराने,राहणीमानानेही आधुनिक असलेल्या स्त्रिया बाळंतपणानंतर वारा पिऊन फुगलेल्या तंबूप्रमाणे दिसायला लागतात. ओघळलेलं शरीर घेऊन, अस्ताव्यस्त अवस्थेत कंगवाही न फिरवलेल्या केसांनी, दुधाचा वास चिकटलेल्या ढगळ्या गाऊनच्या अवतारात या बाळंतीणी झाकोळलेल्या दिसतात.मान्यच आहे की बाळाला जन्म देणं,त्याचं पहिल्या वर्षभरातलं संगोपन खूपच चॅलेंजिंग असतं.थकवा आणणारं असतं.अगदी हा निर्णय आपण का घेतला असही वाटून जातं. पण तरीही हे लक्षात घ्यायलाच हवं की हा निर्णय घेतला तेव्हाच तुमचं आयुष्य ३६० अंशाने बदलणार आहे यावर शिक्कामोर्तब झालं होतं. ते इथून पुढं कधीही पूर्वीसारखे होणार नाही,हे स्वीकारूनच पुढचं पाऊल टाकणं योग्य असतं. शरीरात बदल होणार,वजन वाढणार…पण हे कायमस्वरूपी नाही, पुन्हा बाळाचं अंगावर दूध पिणं बंद झालं की पूर्वपदावर गाडी आणू शकतो आपण. त्यासाठी कष्ट घ्यायची तयारी तेवढी हवी. आणि या मधल्या काळात बाळाच्या बाबांनी सुद्धा उगाच सदानकदा गोंधळलेल्या अवस्थेत रहाणं सोडून शक्य तेवढी मदत करणं अपेक्षित आहे.आपली बायको दिवसरात्र या नाव्याने आलेल्या बाळा भोवतीच रहाते, आपल्याकडं लक्षच देत नाही,साधं बोलायला जावं तर हीचं आपलं बाळाचं डायपर बदलणं,दूध पाजणे हेच चालू असतं….अशी तक्रार मनात सुद्धा आणू नये. उलट बाळाच्या वस्तू,कपडे जागच्या जागी घडी करून ठेवणं, हळूहळू सवय झाल्यावर काही बाळाची कामं स्वतःहून करणं हेही जमूच शकतं .आता पूर्वीसारख बाळंतपण म्हणजे अंधारी कुबट एवढीशी खोली आणि त्यात डोक्याला कापड गुंडाळून बसलेली आजागळ बाळंतीण,धुपा-धुराचा वास असे चित्र राहिलेलं नाही. आधुनिकतेनं या चित्राला पुसून त्या जागी अतिशय सुंदरपणे सुशोभित केलेली प्रसन्न टवटवीत फुलांनी सजवलेली, जागोजागी बाळाचे सुंदर फोटो लावलेली सर्व सुविधायुक्त स्वच्छ आणि स्वतंत्र अशा रूमचं चित्र आणल आहे जे आजच्या राहणीमानाला साजेसच आहे. हा बदल निश्चितच आनंददायी आहे.
मातृत्व म्हणजे फक्त स्त्रीनं सोसण्याचा काळ आता संपलेला आहे. जितकी महत्त्वाची जबाबदारी निसर्गानं स्त्रीवर सोपवलेली आहे त्यात आता ‘त्या’चाही मोलाचा सपोर्ट मिळताना दिसतो. बाळ होणं म्हणजे दोघांच्याही पूर्ण आयुष्यालाच एक नवीन आयाम मिळणं, सहजीवनाची व्याख्याच बदलणं असलं तरी संपूर्ण तयारीनेच आताचे आई-बाबा या अनुभवांना सामोरे जाताना दिसतात. तोही तिच्या अस्ताव्यस्त सुटलेल्या शरीराची चेष्टा न करता तिला व्यायाम करण्यासाठी वेळ परिस्थिती तयार करतोय आणि महत्त्वाचं म्हणजे तिला त्यासाठी उद्युक्तही करतोय. आताचे आई-बाबा गरोदरपण, बाळंतपण, मुलाची जबाबदारी या गोष्टी फार विचारपूर्वक समंजसपणातून समजून घेऊन करतात. आयुष्यातले हे अतिशय सुंदर मौल्यवान क्षण समरसून जगणं हेच तर खरं आई-बाबा होण्यातलं सुख आहे. यालाच तर खरं मातृत्व म्हणतात जे दोघांच्याही आतून उमलून येतं. इवल्याश्या बाळाला मोठं करताना त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्याला सजगतेने एकत्र राहून साथ देणं हे मातृत्व. अर्थात हा आई-बाबांचाही जन्म सोहळाच एकप्रकारे …तोही अतिशय आनंदाने साजरा करणं….म्हणजे मातृत्व!
अंजली दीक्षित-पंडित
९८३४६७९५९६