येणारे वर्ष तणावमुक्तीचे जावो
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
· मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना शाबासकीची थाप…
· नववर्ष तणावमुक्तीचे जावो अशा पोलिसांना शुभेच्छा
मुंबई
‘महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाला तोड नाही. पोलिसांच्या सूर्यप्रकाशा इतक्या स्वच्छ कर्तृत्वावर कुणीही डाग लावू शकत नाही. असेच कर्तृत्व येणाऱ्या वर्षभर नव्हे तर पुढील कित्येक वर्षे गाजवत रहा. नवीन वर्ष पोलीस दलातील सर्वांसाठी तणावमुक्तीचे जावो ही प्रार्थना,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
नववर्षाच्या प्रारंभीच मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन कोविड योद्धे तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, तुम्ही दक्ष राहता. तुम्ही सज्ज राहता म्हणून आम्ही नागरिक म्हणून सण, उत्सव शांततेत करू शकतो. तुम्हाला आज धन्यवाद देण्यासाठी एक कुटुंबप्रमुख आणि नागरिक म्हणून आलो आहे. कोरोनाच्या या संकटकाळातही पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. या काळात अनेकांना वर्क-फ्रॉम-होम म्हणून काम करण्याची सोय होती. पण पोलिसांसाठी असा पर्याय नाही. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अनेकांना शहीद व्हावे लागले.
पोलिसांसह महसूल, आरोग्य अशा विविध यंत्रणांतील अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावल्याचे नमूद करून, मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, व्यवहार बंद ठेवणे ही गोष्ट योग्य नाही, हे सगळ्यांनाच कळते. पण अजूनही संकट गेले नाही. पाश्चिमात्य देशात कोरोनाचा नवा धोका तयार झाला आहे. त्यामुळेच नागरिकांच्या हितासाठी किमान खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. जीव धोक्यात घालून यंत्रणा काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी किमान खबरदारी घ्यावी, शिस्त पाळावी म्हणून जमावबंदीचे आदेश दिले आहेत. नवीन वर्षाचे स्वागत आनंदात आणि उत्साहातच व्हावे. पण भानावर राहून पुढचे पाऊल टाकावे अशी अपेक्षा आहे. त्यासाठीच काही बंधने घातल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी सतत कर्तव्याच्या विचारात असतात. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना वेळ-काळ याची पर्वा न करता काम करावे लागते. चोवीस तास त्यांना कामासाठी तातडीचे बोलावणे, तपास आणि बंदोबस्त यांसाठी सज्ज रहावे लागते, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र आणि मुंबईच्या नागरिकांच्या वतीने आज नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी येथे आलो आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाला तोड नाही. आपल्या पोलिस दलाची परंपरा आणि कर्तृत्वच असे उत्कृष्ट आहे. असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट तपास आणि गुन्ह्यांची उकल करून, तातडीने मुद्देमाल संबंधितांना परत करणाऱ्या पोलीसांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आदी उपस्थित होते.