You are currently viewing केव्हा तरी एकांतात…

केव्हा तरी एकांतात…

*मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*केव्हा तरी एकांतात…* 

 

केव्हा तरी एकांतात

भारी मागे जाते मन

डोळ्यापुढे येते गाव

आठवते बालपण

 

कौलारूच इवलीशी

अशी होती शाळा छान

दाट मोठाली ती झाडं

भले मोठे पटांगण

 

मातीचेच होते घर

खेळायला ते अंगण

लपाछपी नि लगोरी

खेळ होते सोपे छान

 

सवंगडी माझे भारी

पिंपळाचा मोठा पार

खेळतांना पारावर

सावलीही गार गार

 

रंगे अंगतपंगत

घरचाच खाऊ छान

वाटावाटी मजा भारी

अभ्यासाचा नसे ताण

 

हरवले बालपण

हरवली गोड नाती

आयुष्याच्या सांजवेळी

आठवणी सतावती

 

@अरुणा गर्जे

प्रतिक्रिया व्यक्त करा