You are currently viewing शिष्यवृत्ती पुनर्स्थापनेच्या प्रक्रियेबाबत आवाहन

शिष्यवृत्ती पुनर्स्थापनेच्या प्रक्रियेबाबत आवाहन

शिष्यवृत्ती पुनर्स्थापनेच्या प्रक्रियेबाबत आवाहन

 सिंधुदुर्गनगरी

विद्यार्थी, विविध संघटना व शासनाचे विविध विभाग यांची मागणी विचारात घेता माहिती व तंत्रज्ञान विभागाने राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी अनावधानाने अथवा नजरचुकीने  ‘Right to Give-up’ हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील, केवळ अशा विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज Revert Back (पुनर्स्थापनेची) सोय महाडिबीटी पोर्टलवर 30 जून 2024 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली  असल्याची माहिती समाज कल्याण चे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.

सद्यस्थितीत शैक्षणिक वर्ष 2023-24  या वर्षांकरिता महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करणे सुरू आहे. तथापि, अर्ज स्वीकृती मॉड्यूलमध्ये महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनमध्ये शिष्यवृत्ती अर्ज भरत असतांना ‘राईट टू गिव्ह अप’ चा टॅब नव्याने प्रथमतःच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ज्याद्वारे शिष्यवृत्तीचा लाभ कायमस्वरूपी थांबविण्याची किंवा सोडून देण्याची तुमची इच्छा असेल तरच “राईट टू गीव्ह अप” हे बटन दाबावे असा त्यावर उल्लेख आहे. ही सुविधा प्रणालीवर नव्याने प्रथमतःच उपलब्ध करून दिलेली असल्याने सदर टॅब अनेक विद्यार्थ्यांकडून अनभिज्ञतेतून अथवा नजरचुकीने क्लीक झाला होता, पर्यायाने असे विद्यार्थी शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्षा शुल्कापासून वंचित राहत होते.

याबाबत विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य Login मधून आपला अर्ज Revert Back करून घेणे आवश्यक आहे. Revert Back झालेला अर्ज 30 जून 2024 अखेर विद्यार्थ्यांच्या Login मधून ऑनलाइन फेर सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे कि, या प्रक्रियेचा अवलंब करून त्यांचा अर्ज विहित मुदतीत Revert Back करून घ्यावा व यांची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. याबाबत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सूचना देण्याबाबतचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, संतोष चिकणे यांनी केले आहे.  या प्रकरणी कोणतीही अडचण असेल तर सहायक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग या कार्यालयांशी 02362-228882 येथे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा