You are currently viewing बांगलादेशवर विजयासह भारत उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर

बांगलादेशवर विजयासह भारत उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर

*हार्दिक-कुलदीपची दमदार कामगिरी*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

शनिवारी बांगलादेशविरुद्ध ५० धावांनी दणदणीत विजय नोंदवल्यानंतर भारताने उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा आणखी बळकट केल्या आहेत. यापूर्वी टीम इंडियाने सुपर- मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध ४७ धावांनी विजय मिळवून विजयी मोहीम तिव्र केली होती. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशविरुद्ध २० षटकांत ५ गडी गमावून १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १४६ धावा करता आल्या.

सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने गट-१ च्या गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. दोन सामन्यांत सलग दोन विजयांसह त्यांच्या खात्यात चार गुण जमा झाले आहेत. याशिवाय त्यांची निव्वळ धावगती +२.४२५ झाला आहे. त्याचवेळी त्यांना त्यांचा पुढील सामना सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. भारताने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. सध्या त्यांच्या खात्यात दोन गुण आहेत. पहिले स्थान मिळविण्यासाठी त्यांना रविवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळवण्यात येणारा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

१९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला लिटन दास आणि तनजीद हसन यांच्यामुळे चांगली सुरुवात झाली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी झाली. लिटन १० चेंडूत १३ धावा करून बाद झाला. त्याचवेळी ६६ धावांवर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर तनजीदने पायचीत बाद केले. तो २९ धावा करून तंबूमध्ये परतला. या सामन्यात कर्णधार नजमुल हसन शांतोशिवाय बांगलादेशकडून एकही फलंदाज खेळला नाही. त्याने ३२ चेंडूंचा सामना केला आणि एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. मात्र, अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना बुमराहने त्याला आपला बळी बनवले. भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशची फलंदाजीची क्रमवारी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या सामन्यात तौहीदने चार, शाकिब अल हसनने ११ धावा, महमुदुल्लाहने १३ धावा, झाकीर अलीने एक धाव, रिशाद हुसेनने २४ धावा केल्या. तर मेहदी हसन आणि तनजीम अनुक्रमे पाच आणि एक धावा करून नाबाद राहिले. भारताकडून कुलदीप यादवने तीन तर अर्शदीप आणि बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी हार्दिक पांड्यानेही एक विकेट घेतली.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि भारतीय संघाला २० षटकांत ५ गडी गमावून १९६ धावा करण्यात यश आले. या विश्वचषकात भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताने या स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या केली. नॉर्थ साऊंड स्टेडियमवर टी२० मधील ही संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती, मात्र कर्णधार रोहित शर्माला ही भागीदारी आणखी मोठी करता आली नाही आणि तो शाकिब अल हसनच्या चेंडूवर बाद झाला. रोहितच्या विकेटसह शाकिब टी२० विश्वचषकामध्ये ५० विकेट्स पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरला. खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीची बॅटही या सामन्यात बोलली आणि त्याने २४ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. हार्दिक नंतर कोहली भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. त्याचवेळी शिवम दुबेने हार्दिक पांड्याला चांगली साथ दिली आणि २४ चेंडूत ३४ धावांची खेळी खेळली. भारतीय संघ २०० धावांचा टप्पा पार करेल असे वाटत होते, मात्र बांगलादेशचे गोलंदाज काही प्रमाणात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरले.

हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. उद्या सकाळी ६ वाजता ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान तर रात्री ८ वाजता अमेरिका विरुद्ध इंग्लंड सामना होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा