– खास. विनायक राऊत
कणकवली
सह्याद्रीच्या पायथ्याशी लघुपाटबंधारे प्रकल्प झाल्यास सिंचनाचे क्षेत्र वाढण्याबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. दिगवळे-रांजणवाडी येथे धरणप्रकल्प होण्यासाठी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आहे. धरणप्रकल्पाच्या सर्व्हेक्षणासाठी आवश्यक तो निधी विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे. प्रकल्पाचे सर्व्हेक्षण तातडीने करण्यात येणार आहे, असे खा. विनायक राऊत यांनी सांगितले.
खा. विनायक राऊत यांनी शुक्रवारी कणकवली तालुक्यातील दिगवळे, नाटळ, दारिस्ते, शिवडाव, गांधीनगर आदी गावांचा दौरा केला. शिवडाव येथील गडनदीवरील बंधार्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर दारिस्ते ग्रा. पं. ला भेट देत कुडाळ तालुक्यातील घोडगे-कडावल मार्गाला जोडणार्या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर दिगवळे-रांजणवाडीला भेट देत हळदीचा माळ येथे ग्रामस्थांकडून मागणी होत असलेल्या धरण प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी जि. प. सदस्य बाळा भिसे, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, विभाग प्रमुख आनंद आचरेकर, युवासेना तालुका समन्वयक गुरूनाथ पेडणेकर, कुंभवडे सरपंच आप्पा तावडे, हेमंत सावंत, शामसुंदर परब आदी उपस्थित होते.
दिगवळे-रांजणवाडी येथे चंद्रकांत कोठावळे यांच्याकडे झालेल्या बैठकीत लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देव शेट्टी यांच्याशी धरणप्रकल्पाच्या तांत्रिक बाजूविषयी चर्चा केली. तांत्रिकदृष्ट्या प्रकल्पासाठी जागा योग्य असल्याचे देव शेट्टी यांनी सांगितल्यानंतर त्याच्या सर्व्हेक्षणासाठी आवश्यक तो निधी शासनाकडून दिला जाईल असे खा. राऊत यांनी सांगितले. यावेळी शामसुंदर जाधव, माजी सरपंच दीपक मेस्त्री, भाई वाळवे, पांडुरंग माने, शशिकांत रेवडेकर, मनोहर माने आदी उपस्थित होते. रांजणवाडी या दुर्गम भागातील विविध समस्यांची माहिती मधुकर जाधव यांनी दिली. येत्या काही दिवसात धरणप्रकल्पाचे सर्व्हेक्षण सुरू करण्यात येणार असून त्यासाठी ग्रामस्थांकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे सांगण्यात आले.