*लेखिका सौ.अमृता मनोज केळकर लिखित अप्रतिम लेख*
*पाहुणी*
संध्याकाळी सहज फेरफटका मारायला जावं म्हणून बाहेर पडले. एकटीच होते, तरीही फिरत फिरत बरीच लांब आले. रस्त्याच्या पल्याड एक छोटंसं देऊळ आहे गावदेवीचं. दर्शन घेऊन थोडा वेळ तिथल्या कट्ट्यावर बसावं आणि घरी परतावं असा विचार केला.
तिथल्या आवारात पाऊल ठेवताक्षणीच आसमंतात भरून राहिलेल्या रातराणीच्या सुगंधाने अगदी भारावून गेले. खूप दिवसांनी तो ओळखीचा गंध सापडला होता. ऊर भरून सुगंध घेऊन देवीच्या गाभाऱ्याशी आले. फुलं नाही, उदबत्ती – ओटी किंवा साधी खडीसाखर सुद्धा नाही, माझ्या हातात देवीला वहावं असं काहीही नव्हतं. मग काय, तिनेच दिलेलं एका हाती प्रारब्ध आणि दुसऱ्या हाती नशीब दोन्ही जोडलं आणि मनोभावे नमस्कार अर्पण केला.
नुकतीच सांज आरती झालेली होती. तिथल्या गुरुजींनी खोबऱ्याचा तुकडा आणि साखरफुटाणे हातावर ठेवले. जरावेळाने निघाले. तोवर रातराणी आणखी गंधाळली होती. मनात आलं, ही कुंडित लावून जगेल का?
दुसऱ्या दिवशी सकाळी गपचुप कात्री आणि पिशवी घेऊन तिथेच गेले. एक चांगली पोसलेली फांदी व्यवस्थित कापून आणली. फांदीचं कापलेलं टोक मधात बुडवून, छोट्याश्या पिशवीत खत वगैरेचं मिश्रण घालून पिशवीत खोवली. थोडंसं पाणी घातलं. काही दिवसांनी तिला हलकी पिवळसर हिरव्या रंगाची पालवी दिसायला लागली. फांदी जगल्याचा आनंद झाला. आता तिची रवानगी मोठ्या कुंडीत केली.
रातराणी जगली! थोडी मोठी होऊन तिला चार पाच फांद्या आल्या देखील. निसर्ग त्याचं काम चोख पार पाडत होता. पण अनेकदा मानवी मनाची उत्सुकता अस्वस्थतेत बदलते ती परिपक्वतेच्या शोधात! कधी एकदा हिला फुलं येतील आणि कधी एकदा मी तिच्या शेजारी रोज तिच्यासारखीच गंधाळेन असं झालं होतं.
खूप खूप वाट पाहिली. पण तिला कळ्या येईनात. फक्त नवी पालवी फुटत होती. माझा उत्साह मावळू लागला तसं तिला पाणी घालण्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं.
त्याच महिन्यात खूप कामं साठली होती. जवळपास पंधरा वीस दिवस बागेकडे लक्ष द्यायला जमलं नाही. पाऊस पडू लागला होता. पाऊस जोर धरू लागला. बाहेरची कामे जरा संथ झाली. एकदा पाऊस उघडला असताना संध्याकाळचा चहा बाल्कनीत बसून प्यावा असं मनात आलं. खुर्चीवर टेकताक्षणी समोर कुंडीत रातराणी दिसली. फांद्यांवर पांढरा रोग पडून बरीचशी पालवी मरगळून गेली होती. घाईने उठून कात्री घेतली आणि रोग लागलेल्या फांद्या भराभर कापून दूर फेकून दिल्या. मनात विचार आला, बाबांच्या मित्राकडे शेत आहे तिथे देऊन टाकावी… नकोच इथे… ताबडतोब फोन करून त्यांना शेतावर द्यायला सांगितलं. तो शेतकरी म्हणाला, पुढच्या महिन्यात गाडी घेऊन येईन तेंव्हा नेतो. त्यानंतर परत सगळ्या कुंड्यांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून कामवाल्या मावशींना सांगून ठेवलं की रोपट्यांना पाणी घालत जा.
एका संध्याकाळी कामावरून घरी आले. हातपाय धुवून देवासमोर दिवा लावावा म्हणून वात वळायला घेतली. तितक्यात वाऱ्याच्या एका संथ झुळुकेसरशी रातराणीचा सुगंध घरभर पसरला. घाईघाईने दिवा लावून धावतच बाल्कनीत आले. समोरचं दृश्य पाहून आनंद गगनात मावेना! रातराणीला शेकड्याने फुले फुलली होती…
दुसऱ्या क्षणाला आठवलं की उद्या तो शेतकरी हे झुडूप घ्यायला येणार आहे. काळजात चर्र झालं. आपण लावलेलं, जोपासलेलं, वाढवलेलं हे सुंदर रोपटं दुसऱ्याला देऊन टाकायचं? म्हणजे ही रातराणी आपली पाहुणी ठरली का? छे छे नको द्यायला… पण कसं चालेल असं…आता देणार नाही म्हंटलं तर वाईट दिसेल. विचारचक्र चालू झाली… मुलगी सुध्दा पाहुणीच असते की! आईवडिलांनी लाडाकोडात वाढवलेला काळजाचा तुकडा लग्न करून दुसऱ्याच्या घरी पाठवताना तो सुखसोहळा असला तरी किती यातना होत असतील त्यांच्या मनाला… आई-बाबां विषयी जाणवलेली ती सहवेदना साहवेना मला…
सगळी कामे आवरून नेहमीप्रमाणे रात्री डायरी लिहायला बसले…
Dear diary,
I had a feeling today that I never felt before… Although I’m content with the happiness of having a wonderful boy, I always yerned for a girl child. And today I’m despondently relieved for not having one!
…………
✍️ सौ. अमृता मनोज केळकर