You are currently viewing आरोग्यदूत अमर जाधव यांचा डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

आरोग्यदूत अमर जाधव यांचा डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

सातारा (गुरुदत्त वाकदेकर) :

 

वाई तथा ‘विराटनगरी’ मधील शेंदूरजणे या गांवचे सुपुत्र अमर जाधव यांच्या समाजसेवा तथा आरोग्य सेवाकार्याची दखल घेऊन निशा फाऊंडेशन बेंगलोर (कर्नाटक राज्य) यांनी त्यांच्या समाजसेवा कार्याच्या सन्मानार्थ त्यांना डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार २०२४ या अत्युच्च मानाच्या अलौकिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

निराधार, बेघर आणि अनाथ रुग्णांच्या असंख्य दुःखमय वेदनानांवर सुखाची हळुवार फुंकर घालत, त्यांची प्रेममायेने विचारपूस करून, त्यांच्या दुःखाला आपलंच दुःख समजून, निराकारपणे आपल्या वाट्याचं उरलं सुरलं सुख त्यांना आस्थेने देणारे, त्यांच्या दुःखाला सुखात बदलण्यासाठी अहोरात्र धडपडणारे, नि:स्वार्थ वृत्तीने मदत करणारे, आरोग्यदूत अमर जाधव हे मुंबईतील एका नामवंत सिक्युरिटी गार्ड कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. आपला उदरनिर्वाह करत त्यांनी जनसामान्यांच्या आरोग्यसेवेसाठी स्वतःला अहोरात्र झोकून दिले आहे.

छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीमाई, रमाई, मदर टेरेसा यांच्या विचार वारसाने झपाटलेल्या अमर जाधव यांच्या अंत:करणात समाजातील रुग्णांप्रति मायेचा ओलावा आहे. स्वतः चा क्षुद्र स्वार्थ विसरुन केवळ परसेवेसाठी आणि परोपकारासाठी देह झिजवण्याची उच्चतम क्षमता त्यांच्यात आहे.

अमर जाधव हे मुंबईतील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या वरळी विभागात देखील सामाजिक, धार्मिक व राजकीय अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. वरळीतील अत्यवस्थ रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी पोदार रुग्णालयात तातडीची व अत्यावश्यक आयसीयु वैद्यकीय सुविधा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात अमर जाधव हे अग्रणी आहेत. ते वरळीतील नावाजलेल्या शांती वैभव बुद्ध विहार, नवतरुण क्रीडा मंडळ या संस्थेचे माजी अध्यक्ष तर विद्यमान कार्यकारिणी सदस्य आहेत.

आज अखेर अमर जाधव यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अमर जाधव यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा मला मिळालेला अत्युच्च मानाचा पुरस्कार मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र चरणी आणि माझ्या मातापिता, गुरुजनांना, बंधू भगिनींना आणि मित्रांना समर्पित करीत आहे. असं त्यांनी आवर्जून सांगितलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा