You are currently viewing तो आणि ती

तो आणि ती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम लेख*

 

*तो आणि ती*

 

 

वैशाख वणवा सगळ्यांना सहन‌ होईनासा होतो.उग्र आणि उन्हामुळे जीवाची काहिली करणारा. धरती भेगाळून जाते. अगदी आ वासून कधी येतो तो याची चातकासारखी आससून वाट पाहत असते.

*भेगाळली भुई सारी*

*शुष्क नजरेत वेदना*

*तीव्र उन्हाने काहिली*

*गोठली सारी संवेदना…..*

 

*तप्त झाल्या दाही दिशा*

*व्यथा करपल्या रानाची*

*ये कडकडून भेटायास*

*असोशी धरेच्या मनाची….*

 

कधी त्याला कडकडून भेटते असं होतं वसुंधरेला. वेध लागतात आषाढ महिन्याचे. आणि हळूहळू काळेकुट्ट ढग आकाशात दाटी करू लागतात.

आणि अचानक तिची चाहूल लागते. मनाला दिलासा मिळतो.

ती येते हलकेच, हळुहळू, अलगद , नुपूर वाजवत.तिचा पदन्यास भूल पाडतो. ती आली की तिच्याबरोबर येणारा वेड लावणारा मृद्गंध…तप्त धरणीवर ती हलकेच बरसली की ती ही अगदी तृप्त होते,मातीच्या सुवासाने मन ताजेतवाने होते. झाडेसुद्धा मरगळ झटकून स्वच्छ  हिरवीगार दिसू लागतात. त्या हिरवेपणातही किती वैविध्य असते. तिला घराच्या बाल्कनीतून, खिडकीतून न्याहाळताना कसं प्रसन्न वाटतं…. तिला झेलायला, ओंजळीत घ्यायला सगळेच कसे अधीर होतात.

*सृष्टी भिजे जलधारांनी*

*झाले  चराचर ओलेचिंब*

*पानापानातून ओघळती*

*जणू मोतियाचे थेंब थेंब*

 

……आणि तो? येतोच मुळी एखाद्या धटिंगणासारखा. गाजा वाजा करत, गर्जत बरसत ,बरोबर ढोलताशे घेऊन. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट,ढगांचा गडगडाट,  तो आला की सगळ्यांची भंबेरी उडते.सगळे इतस्तत: पळतात आसरा घ्यायला. कुणी झाडाखाली,कुणी छपराखाली.अगदी बरोबर छत्री असली तरीही ,पार उलटीसुलटी करतो तो. कधीकधी त्याचा धसमुसळेपणा‌ रौद्र रूप धारण करून उरात धडकी भरवतो. त्याच्या अंगात दांडगाईच फार. धटिंगणच तो! कुण्णाकुण्णाचा विचार न करता धुडगूस घालत असतो‌….मग मात्र म्हणावसं वाटतं‌ …

 

*असा कसा धटिंगण*

*घालतोस धुडगूस*

*किती विनविले तुला*

*करू नको धुसफूस*

 

*असा नको रे छळूस*

*नको धिंगाणा घालूस*

*गोरगरिबांच्या डोळा*

*नको पाणी रे आणूस*

 

असं म्हणून विनवणी करायला लावणारा तो …..

 

……….त्याचा दोस्ताना घोंघावत असलेल्या वाऱ्याशी, चिखलाशी. तिचं नातं मात्र मातीशी  पानांशी आणि रातराणीशी . त्याचं आणि तिचं का पटावं ? अन् त्या दोघांचं नातं तरी काय? कारण काहीही असो पण आपण मात्र हेच गाणं म्हणतो

 

*पावसाची सर आली…पावसाची सर आली*…

 

*पावसाची सर आली*

*टिप टिप  बरसते*

*कधी नकोशी वाटते*

*पण खोल दिलासा देते*

 

©️®️ डॉ मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा