You are currently viewing प्रबोधन विद्या निकेतनमध्ये प्रवेशोत्सवाचा उत्साह

प्रबोधन विद्या निकेतनमध्ये प्रवेशोत्सवाचा उत्साह

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

जून महिना आला की चाहूल लागते शाळा सुरू होण्याची. पूर्वी १३ जून रोजी सुरू होणारी शाळा अलिकडे १५ जून रोजी सुरू होत असते. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करत असतात. त्यांना विविध भेटवस्तू, स्वागताची रांगोळी, भोजन देऊन, शाळेच्या पहिल्या दिवशी विविध खेळ, स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून शाळेची आवड निर्माण होते, त्यालाच शाळा प्रवेशोत्सव असे म्हटले जाते.

मालाड येथील प्रज्ञा प्रबोधन संस्था संचालित प्रबोधन विद्या निकेतन शाळेत १५ जून २०२४ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सरस्वती पूजन, प्रार्थना करून विद्यार्थ्यांचे स्वागत फुले आणि चॉकलेट्स देऊन करण्यात आले. याप्रसंगी हर्षला राऊत यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून जीवनात शिक्षण व शिस्तीचे महत्व उत्तमरीत्या पटवून दिले. आकांक्षा माने यांनी प्रबोधन विद्या निकेतन या शिक्षण प्रवाहाबाहेर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या शाळेचा इतिहास तसेच शिक्षकांची विद्यार्थ्यां विषयीची तळमळ, आस्था विद्यार्थ्यांना पटवून दिली. मनिषा घेवडे यांनी आयुष्यात एकाग्रता आणि चिकाटी यांचे महत्त्व विविध उदाहरणांनी पटवून दिले आणि ध्यानाचे प्रात्यक्षिकही घेतले. आसपासच्या परिसरातील होतकरू, शिकण्याची इच्छा असणारे जे विद्यार्थी शाळेच्या तसेच शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत, त्यांनी जरूर संपर्क साधावा असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रविणा वाडेकर तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक पटेल, सचिव विजय मांडाळकर आणि खजिनदार प्रभाकर देसाई यांनी केले. मराठी माध्यमाच्या प्रबोधन विद्या निकेतन या मालाड पश्चिमेस असणाऱ्या शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात तसेच आनंदात पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा