*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वी देशपांडे यांच्या “पावसाचे गाणे” या बालकविता संग्रहाचे साहित्यिक श्री.उमेश मोहिते यांनी केलेले पुस्तक परीक्षण*
————————————–
✒️लेखक- उमेश मोहिते- अंबाजोगाई
——
*मुलांना हवे-हवेसे वाटणारे ‘ पावसाचे गाणे ‘*
—————————————–
मुलांना पाऊस अधिकच प्रिय असतो आणि ती सदैव पावसाच्या सरींमध्ये मनमुरादपणे नाचायला, खेळायला, हुंदडायला तत्पर असतात कारण त्यांना पावसाची सोबत अनोखा नि अपार आनंद देत असते.थोडक्यात मुलांच्या निरागस नि संवेदनशील भावविश्वात पावसाचे एक अनोखे असे स्थान असते.हे वास्तव अगदी सहजतेने अधोरेखित करणारा जेष्ठ बालसाहित्यकार अरुण वि.देशपांडे यांचा ‘ पावसाचे गाणे ‘ हा देखणा बालकवितासंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. केवळ बाल-कुमारांसाठी दर्जेदार नि सातत्यपूर्ण लेखन करत असणाऱ्या कवींच्या या नवीन बालकवितासंग्रहात एकूण ४० कविता असून त्यांचे मुलांना सहजतेने आकलन होईल अशा साध्या,सोप्या नि हलक्या-फुलक्या शब्दांत रचलेल्या आहेत.उदा.’ पावसाचे गाणे ‘ कवितेमधून पावसाच्या आगमनाने होणारा आनंद टिपताना कवी म्हणतात :
काळे ढग आकाशी जमती
लख लख विजा चमकती
मने आनंदाने भरून येती
पावसाचे गाणे म्हणती ..
पावसाप्रमाणेच मुलांना शाळेची दीर्घ सुट्टीही अधिकच प्रिय असते आणि सुट्टीच्या काळात त्यांना मिळणारा आनंद अवर्णनीय नि अतुलनीय असतो ; कारण या सुट्टीच्या निवांत कालावधीत त्यांना घरचे कसलेच बंधन नको असते आणि त्यांना खूप धमाल मस्ती करायची असते.मामाच्याही गावाला जाऊन खूप खेळायचे,बागडायचे असते.ही त्यांची अगदी सारी धमाल मस्ती नोंदवताना कवी म्हणतात :
दिवस सुट्टीचे मजेचे भावा
धमाल केली मामाच्या गावा ..
उन्हाळ्याची सुट्टी मौज मजेची
आबा-आजी सोबत राहायची ..
याशिवाय मुलांना छानशी मौज-मजा वाटून त्यांच्या ओठांवर नकळतपणे हसू फुटेल अशा काही गमतीशीर रचनाही या संग्रहात आहेत. उदा.’ काय करावे आता ? ‘ कवितेमध्ये उंदराची झालेली गंमत सांगताना कवी लिहितात :
इटुकला, पिटुकला
उंदीरमामा घाबरला
घर सापडेना त्याला
उशीच्या मागे लपला ..
अगदी अशीच ‘ मज्जाच मज्जा आली ‘ ही कविता असून या कवितेत जंगलात प्राण्यांमध्ये टी-20 मॅच झाल्यामुळे घडणाऱ्या गंमतीचे भन्नाट वर्णन कवीने कल्पकतेने केल्यामुळे मुलांना ते जाम सुखावणारे आहे.कवी लिहितात :
मज्जाच मज्जा झाली
जंगलात टी -20 झाली
एक टीम हत्तीदादाची
दुसरी टीम ससोबाची ..
तसेच संग्रहात आपल्या परिवारातील आजी- आजोबांसारख्या व्यक्तींवर बेतलेल्या काही छानशा कविताही आहेत.शिवाय गणेश उत्सव,दसरा,मकर संक्रांत, दीपावली इत्यादि सणांची आणि कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज,स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर,अटलबिहारी वाजपेयी इत्यादिंच्या अलौकिक अशा कार्याची महती मुलांना सोप्या भाषेत समजून सांगणाऱ्या काही बाल कविताही या संग्रहात आहेत.
उदा.दिवाळी सणाची नेटकी ओळख करून देताना कवी म्हणतात :
दिवाळी आनंदाची
सुखा-समाधानाची
सगळ्या सोबतची
दिवाळी गोडा-धोडाची . . .
तर कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा मुलांना परिचय करून देताना ‘ गौरव मराठीचा करु ‘ कवितेत कवी म्हणतात :
कवी कुसुमाग्रज
अढळ काव्यतारा
कवितेने त्यांच्या
व्यापिले संसारा ..
थोडक्यात वैविध्यपूर्ण बालकवितांनी नटलेला अरुण वि.देशपांडे लिखित ‘ पावसाचे गाणे ‘ हा कवितासंग्रह मुलांना हवा-हवासा वाटेल असा आहे ; कारण त्यातील कविता मुलांचे भावविश्व सहजतेने साकार करणाऱ्या असून या बालकविता मुलांना मौज मजा आणि आनंद देतात.शिवाय या संग्रहातील काही बालकविता वाचून मुलांच्या ओठांवर हसूही फुलणार आहे,हे नक्की ! थोडक्यात मुलांच्या मनोरंजनासोबतच आपले मराठमोळे सण-उत्सव,अलौकिक थोर व्यक्तिमत्त्वे इत्यादिंची सार्थ ओळख मुलांना होण्याच्या उद्देशाने लिहिलेली ही बालकविता मुलांच्या पसंतीस पडून त्यांना गुणगुणावीशी वाटेल,अशी आहे.हेच या संग्रहाचे यश आहे.
—————— ———————-
पावसाचे गाणे – ( बालकविता )
कवी – अरुण वि.देशपांडे
9850177342
————————————-
प्रकाशक – व्यंकटेश कल्याणकर
वल्लरी प्रकाशन, शनिवार पेठ ,पुणे
पृष्ठे – ४८
मूल्य – ८० रु.
संपर्क: 77987 03952
—————————————–
परीक्षण : उमेश मोहिते ,
अंबाजोगाई ( मो.७६६६१८६९२८)