कणकवली तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींसाठी ४९ उमेदवार रिंगणात, दोन ग्रामपंचायतींमधील लढतीचे चित्र ४ जानेवारी रोजी स्पष्ट होणार
कणकवली
कणकवली तालुक्यातील ३ ग्रामपंचायत साठी एकूण दाखल झालेल्या ५० नामनिर्देशन पत्रांमधील तोंडवली – बावशी येथील नामाप्र प्रवर्गातील १ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले. उर्वरित ४९ नामनिर्देशन पत्र वैध ठरल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार सुजाता पाटील यांनी दिली. कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी ग्रामपंचायत मध्ये ७ जागांसाठी ३० अर्ज तर गांधीनगर मध्ये एकूण ७ जागांसाठी प्रत्येकी १ याप्रमाणे ७ अर्ज व भिरवंडे ग्रामपंचायत मध्ये ७ जागांसाठी १३ अर्ज दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची छाननी त्या-त्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समोर गुरुवारी सकाळपासून कणकवली तहसीलदार कार्यालयात सुरू करण्यात आली. यात तोंडवली बावशी प्रभाग क्रमांक 3 मध्ये एकाच उमेद्वाराने नामाप्र जागेसाठी २ नामनिर्देशन पत्र दाखल केल्याने नियमानुसार १ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले. त्यामुळे ७ जागांसाठी २९ उमेदवार रिगणात राहिले. मात्र ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तोंडवली- बावशी व भिरवंडे ग्रामपंचायत मधील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तर गांधीनगर ग्रामपंचायत च्या प्रत्येक जागेसाठी १ उमेदवार असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोधची अधिकृत घोषणा ४ रोजी करण्यात येणार आहे.