You are currently viewing बांदा सटमटवाडी ग्रामस्थांनी घेतली तिलारी कार्यकारी अभियंता यांची भेट,सादर केले निवेदन

बांदा सटमटवाडी ग्रामस्थांनी घेतली तिलारी कार्यकारी अभियंता यांची भेट,सादर केले निवेदन

*बांदा सटमटवाडी ग्रामस्थांनी घेतली तिलारी कार्यकारी अभियंता यांची भेट,सादर केले निवेदन*

*माळीण,गाळेल दुर्घटनेची प्रशासन पुनरावृत्ती करणार का ?? – गुरु कल्याणकर*

बांदा:- येथील सटमटवाडी ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता,सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग,चराठे- सावंतवाडी यांची त्यांच्या कार्यालयात आज भेट घेत निवेदन सादर केले.
निवेदनात सांगण्यात आले की, बांदा सटमटवाडी येथे युगेन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने कृषीजमीन खरेदी केली असून, त्याकरता बेकायदेशीरपणे,कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय तिलारी कालव्याच्या अधिग्रहण क्षेत्रात,तसेच कालव्याला लागून डेव्हलपमेंट च्या नावाखाली बेकायदेशीरपणे खोदकाम,बांधकाम,रस्ते चालू असून तिलारी कालव्यास यामुळे धोका पोहोचण्याची शक्यता आहे.दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी कालवा फुटला होता व त्यामुळे येथील शेतकरी व बागायतदार यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले होते. युगेन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मनमानीपणे सदर जागेतील जुने मोठ-मोठे वृक्ष मुळासकट काढत असून ते आमच्या जीवितासाठी धोकादायक आहे. त्यामुळे सदर डोंगर कोसळून त्याखाली संपूर्ण वाडी येऊ शकते यावर त्वरित कारवाई व्हावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी बोलताना ग्रामस्थ अक्षय परब यांनी सांगितले की, हा आमच्या जीवन-मरणाचा प्रश्न असून गरज पडल्यास यासाठी आम्ही आंदोलन करू.
यावर कार्यकारी अभियंता श्री.जाधव यांनी स्वतः पाहणीसाठी येऊन तिलारी प्रकल्प अधिग्रहण क्षेत्रात कोणतेही गैरप्रकार आढळून आल्यास त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी प्रा.शिवानंद भिडे, श्री.गुरु कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य राजाराम धारगळकर,अक्षय परब, जीवबा वीर, महादेव वसकर, हेमंत दाभोळकर, सुभाष परब, दशरथ परब,मच्छिंद्र गडकरी, दत्तु चौकुळकर,शैलेश केसरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

—————————————–

सटमटवाडी येथील ग्रामस्थांनी शासनाच्या तिलारी पाटबंधारे, राष्ट्रीय महामार्ग, टोल नाका अशा प्रत्येक प्रकल्पासाठी नाममात्र किमतीत आपली सुपिक शेती-बागायतीची जमीन दिलेली आहे.असे असून देखील आम्ही आमची नैसर्गिक संपत्ती पिढ्यान पिढ्या जपलेली आहे.आमचा विकासाला विरोध नाही परंतु आज ज्या पद्धतीने या खाजगी विकासकाकडून निसर्गाचे अतोनात नुकसान केले जात आहे, ते योग्य नसून आमच्या जीवावर बेतणारे आहे.त्यामुळे याविरुद्ध आम्ही लढा देणार आहोत,ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे – प्रा. शिवानंद भिडे

_________________________

जो डोंगर विकासाच्या नावाखाली ओरबाडला जातोय त्यालाच लागुन असलेला गाळेल येथील जुळा डोंगर हा २०२१ मध्ये अशाच बेकायदेशीर वृक्षतोड, अंधाधुंद खोदकाम यामुळे कोसळला होता.त्याची योग्यवेळी दखल न घेतल्याने निष्पाप जीवांचे प्राण गेले होते.राज्यात माळीण गावात झालेली भयानक दुर्घटना देखील आपण पाहिली आहे. प्रशासन या घटनांची पुनरावृत्ती करणार आहे का ??सदर खाजगी कंपनी तिलारी कालवा,महसूल विभाग,खनीकर्म विभाग,वन-विभाग,नगर-नियोजन, नगर रचना, सामान्य प्रशासन,ग्रामपंचायत अशा सर्व शासकीय खात्यांना झुगारत, कोणत्याही कायदेशीर परवानगी शिवाय मनमानीपणे डोंगर पोखरत आहे. या विषयाचे गांभीर्य ओळखत प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी – गुरु कल्याणकर

_________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा