You are currently viewing आठव लाघवी

आठव लाघवी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य तथा महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वि. ग. सातपुते यांच्या “आठव लाघवी” या कवितेचे श्री विनय पारखी यांनी केलेले रसग्रहण*

 

गणितातील समीकरणं सुटली की त्यांची उत्तरं बरोबर मिळतात. राजकारणी लोकांचंही एक बरं असतं ते आपली समीकरणं स्वतः मांडून आपली गणितं बरोबर जुळवतात. परंतु कवींच्या कवितेची समीकरणं म्हणजे प्रेम-जिव्हाळा, निसर्ग, सामाजिक प्रश्न, विरह-वेदना इत्यादी अशा अनेक प्रकारची गुंतागुंतीची समीकरणं असतात. ती समजणं अगदीच कठीण काम असतं. त्यासाठी आपल्याला थेट कवी मनाच्या हृदयाचा ठाव घ्यावा लागतो. आपल्याला त्या कवितेच्या अंतरंगात डोकावून पहावं लागतं. एक वेळ सागराच्या तळाचा ठाव ठिकाणा लागेल परंतु कवीच्या कवितेतील असणाऱ्या कल्पनाविष्कारांचा ठाव लागणं फार मोठं जिकिरीचं कठीण काम असतं. त्या काव्यातून प्रकट होणारी ती वेदना, तो आनंद, ह्याची प्रत्यक्ष अनुभूती कवीला आलेली असते.

*त्या काव्यातील प्रत्येक शब्दनशब्द हा एक दृष्टांत असतो. हीच असते कवीची प्रतिभा. भावकवी विगसा ही त्याला अपवाद नाहीत.*

 

ज्यावेळी एखादी कविता स्फुरू लागते, काव्य आपली प्रतिभा घेऊन जन्माला येऊ लागतं त्यावेळी कवी मनाला अचानक अकस्मात काय होतं तेच समजत नाही. कवीच्या मनात उचंबळून आलेल्या भावनांना शब्द अलगद बिलगतात. जसं एखाद लहान मूल आपल्या आईला बिलगत ना अगदी तसेच. विगसाचंही अगदी असंच होत. *ज्यावेळी त्यांना काव्य प्रतिभा प्रसवते त्यावेळी जणू प्रत्येक शब्द विगसांच्या अंगाखांद्यावर खेळत बागडत असतात.*

ज्यावेळी सरांच्या मनात भावना उचंबळून येतात त्यावेळी ते शब्द अलगद त्यांच्या काव्यपंक्तीत आपोआप जाऊन बसतात. हीच भरलेली शब्दांची ओंजळ ते आपल्यापुढं रीती करतात आणि त्या प्रत्येक ओळीतून ते थेट रसिकांच्या मनाशी संवाद साधतात आणि इथेच विगसा व्यक्त होतात. त्या संवेदना, ते भावनांचे सारे पदर, त्या सुखाच्या गोड रम्य आठवणी ते आपल्यापाशी व्यक्त करतात. हीच असते खरी कवित्वाची प्रेरणा, काव्य प्रतिभा. जिच्यामुळे मनातील रत्नजडित भावनांना शब्दांचे कोंदण लाभत. हे शब्दांचं आणि भावनांचं जे सख्य आहे ना ते म्हणजे एक अद्वितीय असा अविस्मरणीय सोहळा आहे आणि हा त्यांचा संगम नकळत घडतो. हीच असते खरी अनुभूती.

*त्यामुळे कदाचित विगसांच्या प्रत्येक कविता वाचकांच्या थेट हृदयाचा ठाव घेतात.*

 

शब्दप्रभू गोविंदाग्रज म्हणतात ना ” काव्य म्हणजे प्रासादिक रचना नाही. कवितेला आत्मा हवा, तिला अर्थाचा गाभा हवा.. जसे प्रकाशकिरणातील तेज जो दाखवतो तोच खरा “रवी”.. तसे काव्याची रचना जरी कठीण नसली तरी त्यातील अर्थ जो उलगडून दाखवतो तेच खरा “कवी” आणि हे विधान विगासांच्या काव्यरचने बाबत अगदी तंतोतंत लागू होतं.

 

माणूस, त्यांचे नाते संबंध, जगाचा व्यवहार, माणसाची वृत्ती-प्रवृत्ती, त्याचा आनंद, त्याचं दुःख, निसर्ग, प्रेम, सल, आक्रोश असे असंख्य विषय अनादी काळापासून चालत आलेले आहेत. संतांपासून साहित्यिकांपर्यंत सर्वांनी आपापल्या परीने त्याचा वेध घेतला आहे. भावकवी विगसा ही त्याला अपवाद नाहीत. विगसांचा संत साहित्याचा गाढा अभ्यास पाहता त्यांच्या प्रत्येक कवितेतून अध्यात्माचं दर्शन घडतं. त्यांच्या कवितेतील शब्द त्यांच्या मनातील भाव-भावनांना अलगद अलवारपणे आपल्या समोर सादर करतात. ज्याप्रमाणे भ्रमर कमळातील परागकण अलगद सेवन करतात आणि त्याची खबरही कमळाच्या पाकळयांना नसते ना अगदी तसेच ते आपलं अंतरंग आपल्या समोर उलगडतात म्हणूनच कदाचित ते आपल्या कवितांना ‘रचना’ म्हणत असावेत. ज्याप्रमाणे विद्या वाटल्याने वाढते त्याच प्रमाणे आनंदही वाटल्याने द्विगुणित होतो त्याचप्रमाणे विगसांच्या रचना वाचताना वाचक त्या आनंदाने मोहून जातो.

 

ज्याप्रमाणे माउलींना सावळा विटेवर उभा असलेला पांडुरंग अगदी दिव्यतेजाने तेजपुंज, असीम सौन्दर्यवान दिसायला लागतो तशीच अवस्था विगसांची होते. त्याचा अनुभव घेण्यासाठी ते त्यांची दृष्टी अंतरंगात वळवतात. पण जिकडे पाहावे तिकडे तोच, साऱ्या विश्वात तोच, विश्वाच्या पलीकडेही तोच त्यांना दिसतो. अशा आनंदाच्या एकामागूनएक घटना घडत असताना विगसांच्या कविता अचानक अध्यात्माकडे वळताना आपल्याला दिसतात. कारण त्यांना मिळालेला आनंद, त्यांना आलेली अनुभूती, तो आनंद ते आपल्याला वाटण्यासाठी धडपडतात. त्यांच्या कानांत श्रीकृष्णाच्या बासरीचे स्वर घुमू लागतात. ते स्वर त्यांना मंत्रमुग्ध करून सोडतात. त्यात ते इतके एकरूप, तल्लीन होऊन जातात की त्याचे वर्णन करायला त्यांच्याजवळ असलेले शब्द ही कमी पडतात. ते स्वतः निःशब्द होऊन जातात. ज्यावेळेला मूल जन्माला येतं त्याचवेळेला ‘आईचा’ जन्म होतो. प्रसूतीच्या वेदना ह्या वेदना जरी असल्या तरी त्या वेदना उरत नाहीत. असंच असतं कवितेचे ज्यावेळी काव्य प्रसवतं त्यावेळी हृदयाची धडधड ही मौनात विरघळुन जाते आणि उरतात नुसते भावनांना काव्यरूप देणारे शब्द. जे आमच्या सारख्या रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. हाच असतो खरा साक्षात्कार. हीच असते खरी अनुभूती. आणि अशा ह्या गोड आठवणीतून त्यांच्या हातून नकळत काव्य जन्माला येतं आणि ते आपल्याच काव्यप्रतिभेला उद्देशून म्हणतात…

 

काय , जाहले कळेना

सहजी तुज भेटताना

अकस्मातची अलवार

भेटले शब्द भावनांना…

 

त्या लाघवी आठवात

सुखावल्या , संवेदना

ते पदर सारे भावनांचे

उलगडू , कसे सांगना…

 

शब्दची , प्रीतभावनांचे

उमलले कसे ते कळेना

तूच प्रेरणा कवित्वाची

कां लाजतेस तूं कळेनां…

 

स्वर मुग्ध हरि पावरीचे

आत्म , दंगले ऐकताना

तल्लीनता ती नि:शब्दी

मीच , वर्णू कशी सांगनां….

 

मौनात विर्घळता स्पंदने

मीच वेचिले भावफुलांना

अलवार प्रसवली काव्या

क्षणक्षण सारे उसवताना….

 

*(c) विनय पारखी, अंधेरी*

प्रतिक्रिया व्यक्त करा