*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री सौ.आदिती मसूरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पाऊस*
*(अष्टाक्षरी काव्यलेखन )*
येता पावसाची सर
चिंब भिजवी मनाला
हवेतील गारव्याचा
स्पर्श होतसे तनाला
जाई दुःखाचे मळभ
दूर डोंगराच्या आड
भरे आनंदाचा डोह
डुंबतसे मन द्वाड
देती पर्जन्याच्या धारा
तप्त धरणीला शांती
गेली वाहुनिया धूळ
उजळली तिची कांती
शाल हिरवी पांघरे
कडेकपारीची वाट
पर्वतांच्या रांगांमध्ये
शोभे हिरवळ दाट
टपटप पानांमध्ये
थेंब करीतसे नृत्य
डोळे विस्फारती माझे
त्याचे पाहुनिया कृत्य
*🖊️© सौ. आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदूर्ग*