*लिटन-तौहीद ठरले संकटमोचक*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
अमेरिका आणि वेस्ट इंडीज यांनी आयोजित केलेल्या टी२० विश्वचषक २०२४ मधील १५वा सामना श्रीलंकेविरुद्ध दोन गडी राखून जिंकून बांगलादेशने चालू स्पर्धेत मोठा अपसेट निर्माण केला. आजचा शनिवार नामांकित संघांसाठी घातवार ठरत आहे. आज रात्री अजून दोन सामने होणार आहेत. ड गटातील रोमहर्षक लढतीत विजय मिळवत बांगलादेशने सुपर-८ मधील दावेदारी मजबूत केली आहे. सध्या नजमुल हसन शांतोचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. यासोबतच श्रीलंका संघ सलग दुसऱ्या सामन्यातील पराभवासह शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.
डॅलस येथील ग्रँड प्रायरी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेने पाथुम निसांकाच्या ४७ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ९ गडी गमावून १२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने १९ षटकांत ८ गडी गमावून १२५ धावा केल्या आणि सामना दोन विकेट्स राखून जिंकला. बांगलादेशचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे.
१२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. एका धावेवर धनंजय डिसिल्वाने त्याला पहिला धक्का दिला. सौम्या सरकार खाते न उघडता तंबूमध्ये परतला, तर तनजीद हसनला तुषाराने त्रिफळाचीत बाद केले. त्याला केवळ तीन धावा करता आल्या. यानंतर नजमुल हसन शांतो फलंदाजीला आला आणि त्याला तुषाराने आपला शिकार बनवले. बांगलादेशने २८ धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. संघाला आता भागीदारीची गरज होती. अशा स्थितीत लिटन दास आणि तौहीद हृदय यांनी सामन्याची सूत्रं हातात घेतली. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी झाली. १२व्या षटकात हसरंगाने तौहीदला पायचीत टिपले. २० चेंडूत ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून तो तंबूमध्ये परतला तर लिटन दासने २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या. या सामन्यात शकीब अल हसनने ८, रिशाद हुसेनने १ आणि तस्किन अहमदने शून्य धावा केल्या. त्याचवेळी महमुदुल्लाह १६ धावा आणि तंजीम १ धाव घेऊन नाबाद राहिले. श्रीलंकेकडून नुवान तुषाराने चार आणि वानिंदू हसरंगाने दोन गडी बाद केले. त्याचवेळी डिसिल्व्हा आणि पाथिराना यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेची सुरुवात दमदार झाली. मात्र, संघाच्या सलामीच्या फलंदाजांना हा खेळ जास्त काळ चालू ठेवता आला नाही. केवळ १० धावा करू शकलेल्या कुसल मेंडिसच्या रूपाने २१ धावांवर तस्किन अहमदने श्रीलंकेला पहिला धक्का दिला. यानंतर विकेट्सची झुंबड उडाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कामिंडू मेंडिस केवळ चार धावा करून बाद झाला. एका टोकाला पथुम निसांका कमांडवर होता तर दुसऱ्या टोकाला विकेट पडण्याची प्रक्रिया सुरू होती. या सामन्यात सलामीला आलेल्या निसांकाला २८ चेंडूत ४७ धावा करता आल्या. मात्र, आपले अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच मुस्तफिजुर रहमानने त्याला नझमुल हसन शांतोकरवी झेलबाद केले. या शानदार खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून सात चौकार आणि एक षटकार आला. श्रीलंकेतर्फे धनंजय डी सिल्वाने २१, चरिथ असलंकाने १९, वानिंदू हसरंगाने शून्य, अँजेलो मॅथ्यूजने १६, दासुन शनाकाने तीन आणि महीश तीक्षणाने शून्य धावा केल्या. तर, मथिशा पाथिराना आणि नुवान तुषारा खाते न उघडता नाबाद राहिले. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमान आणि रिशाद हुसेनने प्रत्येकी तीन, तस्किन अहमदने दोन आणि तन्झीम हसन शकीबने एक विकेट घेतली.
रिशाद हुसेनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. आज अजून दोन सामने होणार आहेत. रात्री ८ वाजता नेदरलँड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि रात्री १०:३० वाजता ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामने रंगणार आहेत. ह्या सामन्यांतही मोठा उलटफेर होणार का हे पाहाणे औस्तुक्याचे ठरणार आहे.