*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*मना तुझा रंग कसा..?*
आम्ही लहान असतांना वसंतराव कानेटकरांचे
एक नाटक जोरात चालू होते,नाव होते..
“ प्रेमा तुझा रंग कसा?”. आज हा विषय डोळ्यां
समोर येताच मला ते नाटक आठवले.दुसरे एक
प्रख्यात वाक्य आहे..” पानी तेरा रंग कैसा”
जिसमे मिला दो लगे उस जैसा”. किती सत्य
वचन आहे हे! पाणी दुसऱ्याच्या रंगात मिसळून
एकरूप होऊन स्वत:चे अस्तित्व मिटवून टाकते,
याला समर्पण असे यथार्थ नाव आहे.समर्पण असावे तर ..” पाण्यासारखे.. “त्याला मग त्या रंगाचे नामाभिधान मिळते.म्हणजे पाणी आपले
अस्तित्व मिटवून टाकते एवढे जबरदस्त समर्पण पाण्याचे असते. विशेष म्हणजे जगाची सर्व कामे करून पाणी कुठेच थांबत नाही, वाहते असो वा साचलेले, ते आपल्या
जागी परत जाते इतके ते निर्लेप आहे,नि:संग
आहे. आपल्याला असे जमेल? इतकं एकरूप
होता येईल? इतकं नि:संग होता येईल? मोठे
गंभीर प्रश्न आहेत हे.
हे सारे प्रश्न मनाच्याही संदर्भात निर्माण होतातच ना? मन ही किती भयंकर गोष्ट
आहे हो ! अणू पेक्षाही भयंकर म्हणेन मी.
एक तर ते वाऱ्यासारखे अस्तित्वात असूनही
दिसत मात्र मुळीच नाही, पडद्यामागच्या
कलाकारासारखे. खरे म्हणजे मनाविषयी लिहायचे तर एक मोठा ग्रंथच लिहायला
हवा इतका तो प्रचंड विषय आहे. एखाद्या
लेखाचा विषय नाहीच तो.
तर अशा या मनाच्या रंगांविषयी काय आणि
किती लिहावे? सरडा फक्त रंग बदलतो पण
तरी त्याला मर्यादा आहेत. पण मनाला? ते तर
अमर्याद आहे अनंता सारखं. अनंत ज्याप्रमाणे
सतत विस्तारत असते तसेच मनाचेही आहे. त्याला सीमा नाहीत. आणि त्याच्या इतका वेग
तर कुणाचाच नाही. अगदी अवकाशात जाणाऱ्या स्पेस शटलपेक्षाही जास्त वेग आहे त्याचा. ते निमिषार्धात कुठेही पोहोचते हे अगदी खरे आहे.
मनाचा स्वभाव? अरे बापरे! त्याचा थांगपत्ता
तर ब्रह्मदेवालाही लागणार नाही. ही आपलीच
कलाकृती आहे यावर देवांचाही विश्वास बसणार नाही.माणसाच्या अभिनयाला जगात
तोड नाही याचे कारण माणसाच्या अंतरंगात वसत
असलेले हे मन. कोणत्या प्रसंगी कसे वागायचे
हे ते क्षणार्धात ठरवते व उत्तम अभिनय करते.
आवाजात चढउतार बेमालून इतका की, संशय
ही येऊ नये. समोरचा माणूस फसलाच पाहिजे.
मनाचे रंग सांगता सांगता आकाशाचा कागद
संपेल, समुद्राची शाई संपेल पण मनाच्या रंगांचा थांगपत्ताही लागणार नाही, इतके ते गहन आहे.त्याची खोली सागरापेक्षाही गहन
व आकाशापेक्षाही विस्तृत आहे.मनाचे मोजमाप करणेच शक्य नाही.त्याला मोजायला कुठलीही फुटपट्टी नाही. सर्वार्थानेच
ते महान आहे.
जगात व घराघरात रामायण व महाभारत घडवणारे कोण आहे? मंथरेने भडकावले नसते तर? ते विष पेरले नसते तर रामायण कदाचित
घडले नसते. सीतेच्या मनात हरिणाच्या कातडीची लालसा निर्माण झाली नसती तर?
कदाचित पुढचे रामायण घडले नसते. सर्व
आकांक्षांचे मूळ हे “मन” आहे.मनाइतके चंचल
कुणीच नाही. अफाट क्षमता आहे त्याची, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.मन
हे जोडू शकते व तोडूही शकते.मनात विकल्प
आला की ते युद्धही घडवते व समेटही घडवते.
मन पेटवते व मन विझवते, शांतही करते.
सगळे खेळ मनाचेच तर आहेत.एखाद्या नेत्याच्या मनात साम्राज्यवाद बोकाळतो व तो
लगेच अतिक्रमण करून दोन्ही देशातील शांतता घालवतो.
नेत्याचे न दिसणारे मन देश बरबाद करते व
आबादही करते. पांडवांना पाच गावेही न देण्याच्या भूमिकेतून कौरवांचा निर्वंश झालाच
पण असंख्य विधवांना यातनामय जीवन जगावे लागले. “आंधळ्याचे पुत्र अंधच असणार” ह्या द्रौपदीच्या वाक्याने दर्योधन
घायाळ झाला व सुड भावना तीव्र झाली. हे सारे मनाचेच तर प्रताप आहेत. एखाद्याच्या मनातून अशी ही, निर्मिती झाली नाही तर,दुसऱ्याचे मन का पेटेल? ज्या एखाद्या मनातून
रामायण महाभारता सारखे ग्रंथ निर्माण होतात,
तर शिवभक्त रावणाच्या मनातून पाप निर्माण होते.दोन माणसांच्या मनात केवढी ही प्रचंड
दरी आहे! ही दरीच रावणाला मृत्यूकडे व सर्वनाशाकडे घेऊन गेली.बघा, मन भूकंपा पेक्षाही मोठे धक्के देणारे व सर्वनाश करणारे होऊ शकते त्या उलट स्वामी विवेकानंद, सावरकर,
नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या मनाची ठेवण फक्त देशहितकारीच होती.ते फक्त नि फक्त
देशाचेच चिंतन करत असत अशी त्यांच्या मनाची घडण होती. एक चांगले मन काय करू
शकते व वाईट मन काय करू शकते याची
शेकडो उदा. आपल्याला सापडतील म्हणून
मनाचे सगळे रंग आपल्याला कळतीलंच ही
शक्यता अजिबात नाही.
थोडक्यात,
मना रे मना तुझा लागेनाच थांग
कसे मानवाचे तू फेडलेस पांग
तुला वर्णण्यास नाही शब्दकोश
क्षणोक्षणी तुझा वेगळाच भास…
रंग तुझा कसा विधात्यास कोडे
गळी पडे कधी, तू मारतोस जोडे
रंग घेऊनी किती आलास रे मना
प्रश्न हा जगी सुटेनाच कोणा…
धन्यवाद मंडळी..
प्रा.सौ. सुमती पवार. नाशिक
(९७६३६०५६४२)