पर्यावरण संतुलनासाठी जंगली झाडे जोपासली पाहिजेत – सुधीर गोसावी:
मालवणात झाडे भेट उपक्रम संपन्न..
मालवण
आज वाढत्या तापमान वाढीचा धोका लक्षात घेता झाडे लावणे आणि ती जगवणे महत्वाचे बनले आहे. पर्यावरण संतुलनात जंगली झाडे हि पडद्यामागची कलाकार असतात. याच जंगली झाडांची आज मोठी गरज आहे. पूर्वीच्या पिढीने जंगली झाडे जोपासून ठेवली. मात्र आजच्या पिढीला जंगली झाडांची माहिती व त्यांचे महत्व माहित नाही. म्हणूनच पर्यावरण संतुलनासाठी जंगली झाडे जोपासली पाहिजेत, असे प्रतिपादन मालवणमधील शिक्षक व वृक्षप्रेमी सुधीर गोसावी यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमेट्स या ग्रुप्स तर्फे पर्यावरण दिन ५ जून व शिवराज्याभिषेक दिन ६ जून या दोन दिवसांचे औचित्य साधून सलग तिसऱ्या वर्षी रोप खरेदी व भेट उपक्रम मालवण येथील राजकोट किल्ला येथे संपन्न झाला. ज्यांना झाड लावायची आहेत त्यांनी आपल्याला हवी असलेली झाडे सांगावीत किंवा
ज्यांना झाड लावणे शक्य नसेल त्यांनी झाड खरेदी साठी आर्थिक सहाय्य करावे अशी या उपक्रमाची संकल्पना होती. या उपक्रमावेळी मार्गदर्शन करताना सुधीर गोसावी हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वन विभागाचे परिमंडळ वनअधिकारी श्रीकृष्ण परीट, युथ बिट्स फॉर क्लायमेट ग्रुपच्या अध्यक्षा मेगल डिसोजा, अनुभव शिक्षा केंद्रचे जिल्हा समन्वयक सहदेव पाटकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी मेगल डिसोजा यांनी प्रास्ताविक करत झाडे वितरण उपक्रमाची रूपरेषा व त्यामागचा उद्देश स्पष्ट करत युथ बिट्स फॉर क्लायमेट व इकोमेट्स ग्रुप पर्यावरण संवर्धनासाठी करत असलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी वन अधिकारी श्री. परीट यांनी मार्गदर्शन करताना पर्यावरण रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, विविध प्रजातीची झाडे लावली पाहिजेत, लावलेली झाडे जगली पाहिजेत याची काळजी आपण घेतली पाहिजे, तसेच युथ बिट्स फॉर क्लायमेट व इकोमेट्स सारख्या संस्था प्रत्येक गावात निर्माण झाल्या पाहिजेत, असे सांगितले. यावेळी सहदेव पाटकर यांनीही मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी कविता तळेकर यांनी वृक्ष व पर्यावरण संवर्धनाचे महत्व सांगणारी गीते सादर केली. तर उद्योजक भूषण साटम यांनी शिवरायांच्या प्रधान मंडळातील अमात्य व सिंधुदुर्गचे सबनीस रामचंद्र पंत यांनी लिहून ठेवलेले शिवरायांचे वृक्ष लागवडीबाबतच्या आज्ञापत्राचे वाचन केले. तसेच शिवरायांच्या चरित्रावर आधारित कविता सादर केली.
यावेळी नोंदणी केलेल्या वृक्षप्रेमी नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार विविध प्रकारची झाडे भेट देण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. तर आभार सौ. संस्कृती बांदकर यांनी मानले. स्वाती पारकर व मेगल डिसोजा यांच्या नियोजनाखाली आणि सर्व सदस्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्वाती पारकर, चारुशीला देऊलकर, मनीषा पारकर, अनिता पारकर, ओंकार केणी, आनंद हुले, परशुराम पाटकर, पत्रकार भूषण मेतर, दर्शन वेंगुर्लेकर, अक्षय रेवंडकर, भार्गव खराडे, नेहा कोळंबकर, वैशाली शंकरदास, गौरी कुमामेकर, मीना घुर्ये, पल्लवी खानोलकर, अंजना सामंत, ऐश्वर्य मांजरेकर, स्वप्नील गोसावी, तेजस कातवणकर, राहुल जाधव, निमिष बापर्डेकर, आदित्य बटावले, संजय परुळेकर, समीर वायंगणकर, दीक्षांत कुबल, ऋषिकेश सामंत, दत्तप्रसाद सामंत आदी व इतर सदस्य व पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.