देवगड वाडा येथे बंद घर फोडले ; रोख रक्कम व दागिने चोरले
देवगड (प्रतिनिधी) :
बंद घराचा मागील दरवाजा फोडून आत प्रवेश करून घरातील रोख रक्कम व दागीने चोरून नेल्याची घटना वाडा भटवाडी येथे घडली. १६ मे ते ६ जून या कालावधीत ही चोरीची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा भटवाडी येथील वैशाली गोपीनाथ घाडी (६५) या १६ मे रोजी आपले घर बंद करून गोवा येथे गेल्या होत्या. या घराचा बाहेरील परिसराची देखभाल दीपक अंकुश जाधव हे पाहत होते. तेही २९ मे रोजी मुंबईला गेले. ते मुंबईहून परत आल्यानंतर ६ जून रोजी सकाळी ६.३० वा.सुमारास ते त्यांचा घरी गेल्यानंतर घराचा मागील दरवाजा फोडलेला दिसला. त्यांनी याबाबत वैशाली घाडी यांना फोनवरून कळविल्यानंतर त्या गावी आल्या. यावेळी त्यांचा घराचा मागील दरवाजा फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून रोख रक्कम व दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले.याबाबत पोलिसांनी कळविल्यानंतर देवगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर, पो.हे.कॉ.राजन जाधव, आशिष कदम, स्वप्निल ठोंबरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच कणकवली पोलिस उपविभागीय अधिकारी घन:श्याम आढाव यांनीही चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. श्वानपथक व ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या टिमनेही भेट देऊन तपासाला सुरूवात केली. याबाबत तक्रार देण्याची प्रक्रिया गुरूवारी रात्री उशिरापर्यंत देवगड पोलिस स्थानकात सुरू होती.