You are currently viewing याचि देहि याचि डोळा.. आमचं कोकण

याचि देहि याचि डोळा.. आमचं कोकण

आमचं कोकण पहिल्यांदा “याचि देहि याचि डोळा’ आम्ही पाहायला हवं. त्यातून घराघरात प्रत्येक पर्यटनस्थळाच्या शाश्वत विकासाचा ध्यास जन्माला येईल. कोकणच्या पर्यावरण, पर्यटन आणि अर्थव्यवस्थेकरिता डोंगराळ प्रदेश आणि समुद्र हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत.

डोंगरउतारामुळे शेतीस मर्यादा आहेत. समुद्रातील संधी अजून शोधायला हव्यात. अशा अवस्थेतील कोकणी अर्थव्यवस्थेला शाश्वत पर्यटनाची जोड हवी आणि हे शाश्वत पर्यटन हरितच असायला हवं, अशी मांडणी धीरज वाटेकर यांनी केली आहे. पर्यटन, पर्यावरण या दोन क्षेत्राचे वाटेकर अभ्यासक आहेत.

अनेकांनी अशा व्यवस्था उभारल्यातही. हे सगळं साकारात असताना कोकणच्या मूळ निसर्गाला आम्ही कितपत बाधा आणतो आहोत? गावागावातून संपूर्ण कुऱ्हाड बंदीसाठी का प्रयत्न करता येत नाहीत? वणव्यावर नियंत्रण मिळवताना आमची दमछाक होतेय.

राष्ट्रीय महामार्ग साकारताना तोडल्या गेलेल्या हजारो वृक्षांसाठी हळहळण्यापलिकडे काहीही केलेलं नाही. दुतर्फा वृक्ष लावण्यासाठी चळवळ सक्रिय होत नाही, म्हणून कोकणातील आगामी पर्यटनाकडे बघताना शिल्लक राहिलेल्या निसर्गाची काळजी घेण्यासाठी काय करायला हवं, हे ठरवावं लागेल. प्रकृतीदर्शन आणि निसर्ग निरीक्षण हेच कोकण पर्यटनाचे मुख्य अंग असायला हवे, धोरणातही त्याचा समावेश हवा.

कोकणात पर्यटनवाढ करताना पाण्याचा विचार आवश्यक आहे. ती पूर्ण करण्यासाठी लागणारा पुरेसा पाणीसाठा कोकणकडे आहे का? उन्हाळा आला की टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. हे पर्यटनवाढीला आणि कोकण हरित राहण्यातील अडथळे आहेत, याकडे वाटेकर यांनी लक्ष वेधले.

*स्थलांतरित पक्ष्यांनाही फटका*

आज कित्येक पर्यटनस्थळी स्वातंत्र्याच्या नावाखाली धुडगूस चालू असतो. मद्यपींनी मद्यपानाचा आस्वाद घेऊन झाल्यावर टाकलेल्या बाटल्यांचा खच, खाद्यपदार्थ, प्लॅस्टिकचा कचरा हे दृश्‍य आज सर्रास झाले आहे. “यूज ऍण्ड थ्रो’ जीवनशैलीमुळे प्लेट, चमचा, स्ट्रॉ, पाण्याच्या बाटल्या आदी कचरा वाढतोय. पर्यटकांकडून होणाऱ्या या अस्वच्छतेचा फटका स्थलांतरित पक्ष्यांनाही बसतोय. म्हणून स्वच्छतेच्या बाबतीत कोकणने पूर्वेकडील राज्यांचा कित्त्ता गिरवायला हवा.

*प्रदूषण करणाऱ्यांवर आर्थिक भार*

पर्यावरणाचा नाश आणि प्रदूषण करणाऱ्यांवर आर्थिक भार टाकला गेला पाहिजे. लोटे-परशुरामच्या औद्योगिक वसाहतीतून दाभोळच्या खाडीत रासायिनक पदार्थांचा विसर्ग होतो. याचा परिणाम इथले मासे, भाजीपाला आणि इतर घटकांमधून मानवात आणि पशुपक्ष्यांमध्येही होतो. जिल्ह्यात काही भागात आधीच भरपूर प्रदूषण कारखानदारीमुळे सुरू आहे म्हणून प्रदूषणकारी प्रकल्प नको आहेत, असे वाटेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा