– ना.वि.भादुले
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र सागरी अधिनियमातील अधिसूचनेनुसार दिनांक 1 जानेवारी ते 31 मे 2021 पर्यंत पर्ससीन मासेमारीस बंदी करण्यात आलेली आहे. तसेच दिनांक 1 जून ते 31 जुलै हा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी आहे. याबाबतच्या अधिसूचनेची प्रत मच्छिमारी सहकारी संस्थेला देण्यात आली आहे.त्यामुळे सदर कालावधीत यांत्रिक पध्दतीने मासेमारीस पुर्णत: बंदी करण्यात आली असल्याची माहिती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय,(तां.) ना.वि. भादुले यांनी दिली.
नौका पर्ससीन जाळ्याने मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. यामध्ये नौका मूळ बंदरात किंवा अंमलबाजवणी अधिकारी विहीत करतील अशा बंदरात अवरुध्द करुन ठेवण्यात येईल व अभिनिर्णय अधिकारी याच्याकडे दावा दाखल करण्यात येईल. अभिनिर्णय अधिकारी यांच्याकडील दाव्याचा निर्णय लागेपर्यंत नौका विभागाच्या ताब्यात असेल, तथापी नौकेच्या संरक्षणाची जबाबदारी संपूर्ण मालकांची राहील. मात्र मासेमारीस जाता येणार नाही. नौका ज्या बंदरात अवरुध्द करुन ठेवलेली असेल तर पुढील आदेशापर्यंत नौका तेथे न आढळल्यास नौका मालकांवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल. संबंधित नौकेचा परवाना व नौकेची नोंदणी रद्द करण्यात येईल. तरी संबंधितांनी याबाबतची दक्षता घ्यावी. असे आवाहन, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय,(तां.) ना.वि. भादुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.