You are currently viewing निसर्गाची शाळा

निसर्गाची शाळा

*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*निसर्गाची शाळा* 

 

निसर्गाची शाळा भरली

निसर्गाची शाळा

इथे नाही गुरुजी कोणी

नाही फळा काळा

 

 

सगळीकडे वाढलेली

झाडे हिरवीगार

फळे देतात, फुले देतात

सावल्या गार गार

 

 

त्यांच्या कडून शिकू आपण

गुण फक्त देण्याचा

उन्हातही फुलण्याचा

आनंदाने जगण्याचा

 

 

बघा बघा आभाळात

भरारणारे पक्षी

निळ्या निळ्या कागदावर

जणू काही नक्षी

 

 

माणसा रे माणसा

आभाळ तुला पुकारी

पक्ष्यांसारखी घेत जा

सतत उंच भरारी

 

 

कोकिळेकडून गाणे शिका

हत्तीकडून शक्ति

वाघाकडून दरारा नि

कोल्ह्याकडून युक्ति

 

 

वाऱ्याकडून झऱ्याकडून

शिका वाहत जाणे

तुमचेही जगणे मग

होईल सुंदर गाणे

 

 

अनुपमा जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा