You are currently viewing माझे गाव कापडणे

माझे गाव कापडणे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*२०)माझे गाव कापडणे…*

 

मंडळी, मी आज पुन्हा माझ्या लहानपणीच्या

एक दोन आठवणी सांगणार आहे,

अगदी सत्तर वर्षे मागे जाऊ या आपण..तेव्हा मी दर्जा जवळच्या धर्मशाळेला खेटून असलेल्या दुमजली शाळेत शिकत होते. अगदी

सगळा काळ नाही आठवत पण काही घटना आत्ता मी पाहते आहे इतक्या स्पष्ट मला डोळ्यांसमोर दिसतात. साधारण मी चौथीत

असेन तेव्हाची गोष्ट. आज काल हवामान खूप

लहरी झाले आहे, अवकाळी पाऊस गारपीट तर आता नित्याची झाली आहे, इतकी की शेतकरी

त्यात कसा भाजून निघतो आहे याचा विचार

करण्याचेही आम्हाला भान राहिले नाहीये, पंचनामे होतात की नाही, भरपाई मिळते की नाही याचा ही विचार करण्याची गरज आम्हाला वाटत नाही एवढे आम्ही निर्ढावलो

आहोत. पूर्वी ही गारपीट होत होती पण आताच्या इतका निसर्ग लहरी नव्हता असे वाटते.चौथी नि दुसरी असेल बहुतेक एकच शिक्षिका की शिक्षक आठवत नाही पण दोन्ही

वर्ग एकत्र होते. शिक्षक आधी एका वर्गाला अभ्यास द्यायचे मग दुसऱ्या. अशी त्यांची त्रेधा

तिरपिटही (हो, मुले लहान होती ना?)मला डोळ्यांसमोर दिसते आहे. कसे बसे बिचारे मॅनेज करत होते. दुसरा शिक्षक का नव्हता माहित नाही पण यांची मात्र चांगलीच फजिती

होत होती. पाच वाजेची वेळ असावी.

 

अचानक आकाश काळे कुट्ट होत आले. सुन्न

वातावरण, हवा बंद, कुंद वातावरण, आणि

अचानकच ताड ताड ताड ताड गारा पडू लागल्या. पडू नाही कोसळू लागल्या. बाप रे!

आता आठवते काय वेग असेल हो त्या गारांचा? लिंबा एवढ्या छोट्या मोठ्या गारा धबा धबा पत्र्यावर कोसळत होत्या. आम्ही सारी मुले भेदरूव वर्गात चिडीचूप बसलो होतो.

न भूतो न भविष्यती असे गारांचे तांडव चालले

होते. नंतर मला कळले की बुजुर्गांनीही असा

वर्षाव त्यांच्या हयातीत पाहिला नव्हता असा

अभूतपूर्व गारांचा वर्षाव ताड ताड पत्रे वाजवत

होता. लहान लहान लेकरं आम्ही. आजकालचे

पालक गाड्या घेऊन लगेच धावले असते पण

कुणी ही आमची वास्तपुस करायला आले नाही, कारण घरीदारी गारांचा खच पडला होता. गारांच्या वजनाने पत्रे वाकले होते. धाब्याची माती धुवून पन्हाळ गारांनी जाम झाले होते. गांवभर जिकडे तिकडे पांढरा शुभ्र

गारांचा खच. चालायला रस्ता राहिला नाही.

 

सगळा गाव भांबावून गेला. कारण असे तुफान

गावाने कधी पाहिलेच नव्हते. वर्षाव थांबताच

आम्ही पोरे, कळत काहीच नव्हते, पायात चपला नाहीत, तसेच त्या गारांच्या ढिगांवरून

दप्तर सावरत घरी निघालो. पायाला बर्फ झोंबत होता पण मजा वाटत होती. हाशहुश करत घराकडे वाटचाल करत होतो. मी आता

लिहितांनाही गारांवरून चालतांना शेवटच्या गल्लीतून घराकडे वाटचाल करतांना बघते आहे. रस्त्यात घरा घरांच्या मावठीवर गारांचे

खच बघत बघत आम्ही घरी आलो तर सालदार फावडं घेऊन मावठीवरच्या गारा खोदून खोदून काढतांना दिसला. घरोघर हीच

स्थिती होती. गारा एवढ्या होत्या की वितळत

नव्हत्या. जवळपास आठवडाभर गाव गारठलेले व गांवकरी गारा उपसतांना दिसत होते. आता मी लिहितांना विचार करते, तेव्हा तर कळत नव्हते, पिकांचे काय झाले असेल हो? कुणाची गाय मेली कुणाचे बैल मेले कुणाच्या बकऱ्या मेल्या गारांच्या माऱ्याने! जिकडे तिकडे नुकसान व हळहळ.. मना बैले मरी ग्यात हो मी काय करू? मन्या बकऱ्या ग्यात हो मी काय करू? एकच हाहाःकार

गावात माजला होता.

 

वाटते, मला कळत नव्हते तेच बरे होते ना? मला किती वाईट वाटले असते आता आठवून वाटते तसे. माझ्या इतक्या वर्षांच्या आयुष्यातही मी अशा गारा पाहिल्या नाहीत.

नाशिकला एक दोन अनुभव आले पण अगदी

किरकोळ पाच दहा मिनिटे फक्त. मुले गारा वेचायला धावली होती व मी पडलेल्या कैऱ्यांचे

लोणचे घातले होते तात्पुरते खाण्यासाठी. गावात वर्षभर तरी गारांची चर्चा झाली असावी.

कुणी म्हणे, कुणी तरी जादू केली, दुसऱ्या गावी

पडणाऱ्या गारा आपल्या गावाला वळवल्या

अशी ही अंधश्रद्धा, काळच तसा होता, त्यांचा काय दोष ? किती नुकसान झाले असेल मला

समजलेच नाही. कधी कधी अज्ञानात सुख असते ते असे! शेता शेतात मेंढ्यांचे कळप

बसवणारे, त्यांना ठेंगावाले म्हणतात, लोक

म्हणायचे, ठेंगावाल्यांनी गारा वळवल्या. त्यांना जादू येते असे लोक म्हणत व मला मग आणखीनच भीतीने कापरे भरे!

 

दुसरी घटना घडली ती भयंकर आगीची. ती पण न भूतो न भविष्यती. आमच्या कापडण्यात

झेंडा गल्ली म्हणजे बाजार पेठ आहे. सर्व माल

अगदी सर्व तिथे मिळते आज ही. जैन मारवाडी

लोकांची मोठी मोठी दुकाने, सोनाराची , कापडाची, साड्यांची दुकाने या बाजारपेठेत होती. माझी सुमती नावाची जैन मैत्रिण या गल्लीत रहायची. तिच्या वडिलांचे होलसेलचे

मोठे दुकान होते. तेलाचे मोठ मोठे पिंप डब्बे

दुकानात रचून ठेवलेले असत. हे सर्व व्यापारी

धुळ्याहून सोनगिरहून माल मागवायचे. एक

अपंग जैन व्यापारी होता. आता त्याचे वंशज आहेत. खेड्यात लोक सर्रास टोपण नाव ठेवतात व तेच प्रचलित होते. त्याच्या दुकानाला लंगड्याचे दुकान म्हणत. ते सगळा

माल विक्रिला ठेवत. हमखास माल मिळण्याचे ठिकाण म्हणजे” लंगड्यानं दुकान. कोटे चालनी वं? लंगड्याना दुकान म्हा ! कुणाला त्याचे काही वाटत नसे इतके ते रूळले होते.

 

तर, त्या सुमतीच्या म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या

खचाखच मालाने भरलेल्या दुकानाला, कशी

ते माहित नाही पण एक दिवस रात्री अचानक

आग लागली. बाप रे.. फारच भयंकर आग. पाचवी सहावीचे माझे वय. मला लहानपणी

कोणत्याही गोष्टीची भयंकर भीती वाटत असे.

मंडळी, आग इतकी भयंकर होती की रात्रभर

आख्या गावाच्या परिश्रमानेही ती विझली नाही. दोन दिवस आग धुमसत होती पूर्ण दुकान जळून खाक झाले. तेलाच्या पिंपाचे रात्रभर धमाके होत होते.घराची निशाणी ही

शिल्लक राहिली नाही. मी इतकी भित्री की कित्येक महिने त्या गल्लीत मी डोकावले सुद्धा

नाही. जैन समाज वागायला अतिशय सज्जन

माणसे, एकमेकांना सांभाळून घेतात. काय

झाले असेल हो त्या लोकांचे असे उघड्यावर

पडल्यावर? नंतर सुमतीही कधी मला भेटली

नाही. लवकरच तिचे लग्न झाल्याचे कळले होते.तेव्हा कळत काहीच नव्हते. फक्त भिती

वाटायची, कसलीही! मी फक्त एकदाच तिच्या

घरी गेले होते.ती गल्ली, घरं आरपार आहेत.

नंतर लवकरच ते सावरले. जाणार कुठे बिचारे? त्याच गल्लीच्या मागे माझ्या कलावती नावाच्या मैत्रिणीचे घर होते. छगनची

बहिण होती ती. मला वाटते त्याच्या कडे औषधे मिळत असत.त्यांच्या घरी गॅदरिंगचे डान्स

बसवायला, मागच्या दारी जागा होती तिथे आम्ही मैत्रिणी जमत असू.असा हा आठवणींचा गुंता डोक्यात इतका पक्का आहे की, वाटते, काहीच गोष्टी का आठवतात? सगळे का आठवत नाही? आठवले असते तर

किती बरे झाले असते ना? त्याच गल्लीत माझ्या टेलरचेही दुकान होते. तिथे आम्ही जात

असू. आई बहुतेक त्याला घरीच बोलवायची व तो ही यायचा कपडे द्यायला अगदी खुशीत.

त्यांचा ही चेहरा अजून मला आठवतो. बघा किती सोप्या होत्या ना गोष्टी पूर्वी? आई, दुकानातून कापडाचे तागे घरी दाखवायला

मागवायची व दुकानदारही द्यायचे असा तो काळ होता, सुखाचा. समृद्धीचा, विश्वासाचा.

सोनार ही घरीच यायचा.आई कधी जात नसे.

सारेच हरवले हो आता? का बरे असे झाले?

बालपण आठवले की फक्त सुखच आठवते हो, दु:ख सापडतंच नाही. आणि आता..

अगदी उलटं झालंय् हो..

फिरेल का चक्र पुन्हा सुलटं …?

माहित नाही, तुम्हालाही…?

 

धन्यवाद..

जय हिंद .. जय महाराष्ट्र…

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा