You are currently viewing अपूर्ण एस. टी. स्थानकाचे लोकार्पण झाल्या नंतर तरी काम पूर्ण करा! – आमदार रवींद्र चव्हाण यांचा टोला

अपूर्ण एस. टी. स्थानकाचे लोकार्पण झाल्या नंतर तरी काम पूर्ण करा! – आमदार रवींद्र चव्हाण यांचा टोला

समस्या दूर न झाल्यास तीव्र जनआंदोलन करणार

भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रविंद्र चव्हाण यांचा ईशारा

सिंधुदुर्ग

कुडाळ एस. टी. स्थानकाच्या इमारतीची अनेक मूलभूत कामे अपूर्ण आहेत परंतू ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले अपयश झाकण्यासाठी शिवसेनेकडून उद्घाटन केले जात आहे. ही इमारत उभाताना जनतेच्या सोयीच्या दृष्टीने सुविधा न उभारता केवळ कर्मचाऱ्यांचा विचार करून बांधण्यात इमारत उभारली आहे अशी टीका भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली.

कुडाळ एस. टी. स्टँडच्या नवीन इमारतीमध्ये अनेक उणिवा आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एका अनधिकृत बांधकामामुळे एस. टी. स्टँड मधून बाहेर पडताना समोरचे दृष्टीक्षेत्र अत्यंत कमी होत असल्याने ते बांधकाम काढणे गरजेचे आहे अन्यथा अपघात होऊ शकतात. सुमारे ६,००० प्रवासी रोज या स्थानकावरून प्रवास करत असल्याने पुरेशी आसन व्यवस्था इमारतीत असणे आवश्यक आहे, परंतु जेमतेम १०० जण बसू शकतील एवढीच सोय केलेली आहे. पावसाळ्यात तर प्रवाशांना उभे राहायला सुद्धा आसरा मिळणे कठीण होणार आहे, इमारतीच्या सदोष रचनेमुळे पावसाच्याझडी पासून देखिल प्रवाशांचा बचाव होणे अशक्य गोष्ट आहे. ईलेक्ट्रिकलचे वायरींग सदोष असल्याने शॉर्ट सर्किट सारखे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपूर्ण डांबरीकरण, पर्जन्य जलवाहिन्यांची सदोष व्यवस्था, अस्वच्छ प्रसाधन गृह अशा अनेक समस्या बाकी आहेत. कुडाळ डेपोतुन मिळालेल्या माहिती नुसार दररोज सुमारे ६,००० प्रवासी ज्या स्टँड वरून प्रवास करतात त्या जिल्ह्यातील एका प्रमुख ST स्टँडच्या अपूर्ण इमारतीच्या उद्घाटनाची घाई शिवसेनेला झाली आहे, तरीही प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून उद्घाटन करा परंतु ज्या अत्यावश्यक सूचना परिवहन मंत्री अनिल परब यांना फोन द्वारे केलेल्या आहेत त्यांची तातडीने पूर्तता झाली पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी राज्यमंत्री आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस मा. रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. ऑनलाइन पद्धतीने केले जाणारे अपूर्ण स्थानकाचे उद्घाटन करून शिवसेना समस्यांचे उद्घाटन करत असून मूलभूत समस्यांची पूर्तता झाल्यावरच त्याला बस स्थानक म्हणता येईल असा टोला आमदार चव्हाण यांनी लगावला आहे. कुडाळ एस्टी स्थानकातील समस्यांदूर होऊन जनतेला सुविधा मिळाव्यात या करता सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, कुडाळ तालुका चिटणीस राजेश पडते आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा