शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी क्रिकेटच्या क्षेत्रात आपली इनिंग सुरु केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची सूत्रे नार्वेकरांनी हाती घेतली. त्यानंतर मुंबईकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारी नार्वेकरांची होर्डिंग्स मुंबईत लागली आहेत.
मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत मिलिंद नार्वेकर यांनी क्रिकेट क्षेत्रात आपली वाटचाल सुरु केली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत मिलिंद नार्वेकर आणि सुरेश सामंत यांची MPL च्या गव्हर्निंग कौन्सिलच्या चेअरमपदी बिनविरोध निवड करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी नार्वेकरांकडून मुंबईकरांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारी पोस्टर्स मुंबईत झळकली.
या होर्डिंग्जवर मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांची छायाचित्रे आहेत. तसंच, मिलिंद नार्वेकर यांच्या नावापुढे चेअरमन – मेम्बर कौन्सिल MPL आणि सेक्रेटरी- शिवसेना ही दोन पदं लागली आहेत.
मिलिंद नार्वेकर यांची एमपीएलच्या चेअरमनपदी निवड होणं अपेक्षित मानलं जात होतं. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर मोठ्या कालावधीनंतर मिलिंद नार्वेकरांच्या रुपाने शिवसेनेची एमसीएच्या कार्यक्षेत्रात थेट एन्ट्री झाली आहे.