You are currently viewing जिल्ह्यात  13 जूनपर्यंत मनाई आदेश

जिल्ह्यात  13 जूनपर्यंत मनाई आदेश

जिल्ह्यात  13 जूनपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार  13 जून 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंत जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लोकसभा मतदार संघ 46 रत्नागिरी-सिंधुदुर्गची मतमोजणी दिनांक 4 जून 2024 रोजी होणार आहे. निवडणूकीची मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांकडून मिरवणूकीचे आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे, वर्तमानपत्रांमध्ये वारंवार एकमेकांवर टिका टिप्पणी करणे, सोशल मिडीयावर एकमेकांविरूध्द माहिती प्रसारीत करणे, राजकीय पक्षांमधील किरकोळ वादाचे / आरोप प्रत्यारोपांचे एखाद्या घटनेत होवून, तणाव निर्माण होवुन त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वैयक्तीक व सामाईक मागणीकरीता उपोषणे मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते अशावेळी आदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024, मतमोजणी निकाला अगोदर व नंतरची परिस्थिती, सोशल मिडीयावर व्हायरल होणारे आक्षेपार्ह पोस्ट, तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको यासारख्या प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचीत प्रकार घडु नये, जिल्ह्यातील जातीय सलोखा कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू करण्यात येत आहे. वरील कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे.

कलम 37 (1) नुसार

1) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा  करण्यासाठी

   वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.

२) अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.

३) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे किंवा तयार करणे.

४)  व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे,(ज्या कारणामुळे समाजाच्या भावना

         दुखविली जाण्याची शक्यता असते.)

५)  सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे.

६)  सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही

         वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.

कलम 37(3) नुसार

1) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे  व  सभा घेणे.

 2)  हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न, धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही .

वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा