मतमोजणीसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना करावा लागणार क्यु आर कोड स्कॅन
रत्नागिरी
मंगळवारी 4 जून रोजी लोकसभा निवडणूकीची मतमोजणी होत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मिरजोळे एमआयडीसी मधील भारतीय अन्न गोदामात मतमोजणी होणार आहे. दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार समोरासमोर येऊन वाद निर्माण होऊ नयेत याकरिता पोलिसांनी राजकीय पक्षांसाठी स्वतंत्र जागा नेमून दिल्या आहेत. हा बंदोबस्त करताना पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मतमोजणीच्या ठिकाणी जाताना राजकीय कार्यकर्त्याला क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. क्यू आर कोड स्कॅन केल्यावर मॅपच्या सहाय्याने कार्यकर्त्याला मतमोजणी करीता जाता येणार आहे.
मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मतमोजणीसाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते गर्दी करतात. अशावेळी प्रतिस्पर्धी कार्यकर्ते समोरासमोर येऊन वादाचे प्रसंग घडतात. हे प्रसंग टाळण्यासाठी पोलिसांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी यश हॉटेल समोर अनंत भाटकर यांच्या घरासमोरील मोकळा परिसर नेमून दिला आहे. महायुतीसाठी कोकण रेल्वेच्या विभागीय कार्यालयासमोरील जीएफ कंपनीची मोकळी जागा, बसपा, बहुजन मुक्ती पार्टी, वंचित आघाडी आणि अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसाठी श्री सिध्दीविनायक लाँड्री सर्व्हिसेस समोरील मोकळी जागा नेमून देण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना सोबत मोबाईल, हत्यार, सिगारेट, लायटर आणि धुम्रपानाच्या वस्तू नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी नेमून दिलेल्या जागेवर कार्यकर्त्याला पोहचण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पोलिसांनी तीन क्यू आर कोड तयार केले आहेत. महाविकास आघाडी, महायुती आणि अन्य पक्षाचे उमेदवारांसाठी प्रत्येकी एक क्यू आर कोड तयार करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांना हा क्यू आर कोड स्कॅन करावा लागणार आहे. हा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर मॅपच्या सहाय्याने कार्यकर्त्याला त्यांच्या पक्षाला नेमून दिलेल्या जागेवर पोहचता येणार आहे.