You are currently viewing टी२० विश्वचषकाची दमदार सुरूवात

टी२० विश्वचषकाची दमदार सुरूवात

*टी२० विश्वचषकात एका षटकात सर्वाधिक धावा देणारा गॉर्डन हा दुसरा गोलंदाज ठरला, ॲरॉनची विक्रमी खेळी*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारतीय संघ दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यासाठी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होत असलेल्या टी२० विश्वचषक २०२४ साठी दाखल झाला आहे. टीम इंडियाने २००७ मध्ये उद्घाटनाच्या आवृत्तीत हे विजेतेपद पटकावले होते. १७वर्षे उलटली, पण संघाला एकदाही टी२० विश्वचषक जिंकता आला नाही.

यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत नऊ ठिकाणी टी२० विश्वचषकाचे सामने खेळवले जात आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजच्या सहा तर अमेरिकेच्या तीन जागांची निवड झाली आहे. इंग्लंड संघ गतविजेता आहे. त्यांनी २०२२ मध्ये पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. भारतीय संघ दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याकडे डोळे लावून बसला आहे. भारतीय संघाने २०१४ मध्ये अंतिम फेरीत आणि २०१६-२०२२ मध्ये उपांत्य फेरी गाठली होती, मात्र त्यांना विजेतेपद मिळवता आले नव्हते. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून खूप अपेक्षा आहेत.

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा टी२० विश्वचषक म्हटले जात आहे. यामध्ये एकूण २० संघ सहभागी होत आहेत. सर्व संघांची प्रत्येकी पाच संघांच्या चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताला अ गटात पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि यूएसए सोबत ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. तर भारत पाकिस्तान सामना ९ जून रोजी होणार आहे. भारताचा तिसरा सामना १२ जूनला अमेरिकेसोबत आणि चौथा सामना १५ जूनला कॅनडाशी होईल.

टी२० विश्वचषक २०२४ ची सुरुवात अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील अ गटातील सामन्याने २ जून रोजी झाली. या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण अमेरिकेच्या ॲरॉन जोन्सच्या खेळीने कॅनडावर पराभवाची छाया पडली. या सामन्यात अनेक विक्रम झाले, मात्र कॅनडाचा गोलंदाज जेरेमी गॉर्डनच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा गॉर्डन हा दुसरा गोलंदाज ठरला.

ॲरॉन जोन्स आणि अँड्रिस गौस यांनी दमदार फलंदाजी करत अ गटातील सामन्यात कॅनडाचा सात गडी राखून पराभव करून आयसीसी टी२० विश्वचषक २०२४ मध्ये अमेरिकेची विजयी सुरुवात केली. ॲरॉन जोन्सने दमदार फलंदाजी करत ४० चेंडूत ४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ९४ धावांची नाबाद खेळी केली.

लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाच्या दोन विकेट लवकर पडल्या, पण ॲरॉन आणि आंद्रेस यांनी शानदार भागीदारी करत संघाला केवळ सावरलेच नाही तर त्यांना विजयापर्यंत पोहोचवले. सामन्याचे १४वे षटक टाकायला आलेल्या गॉर्डनचा अँड्रिस गॉस आणि ॲरॉनने चांगलाच सम‍ाचार घेतला. गॉर्डनने पहिलाच चेंडू वाईड टाकला. त्यानंतर अँड्रिजने गॉर्डनच्या टाकलेल्या चेंडूवर षटकार आणि नंतर चौकार मारला. यानंतर गॉर्डनने वाईड आणि सलग दोन नो बॉल टाकले ज्यावर अँड्रिसने एकच धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर अॅरॉनने षटकार ठोकला. गॉर्डनने पुढचा चेंडू पुन्हा वाईड टाकला, तर चौथ्या चेंडूवर अॅरॉनने धाव घेतली. यानंतर अँड्रिसने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला आणि सहाव्या चेंडूला चौकार मारला. अशा प्रकारे गॉर्डनच्या एकाच षटकात अमेरिकेने ३३ धावा केल्या. गॉर्डनचे हे षटक टी२० विश्वचषकातील दुसरे सर्वात महागडे षटक ठरले. या जागतिक स्पर्धेत एका षटकात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर आहे, ज्याने २००७च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत ३६ धावा दिल्या होत्या. त्यावेळी भारताच्या युवराज सिंगने ब्रॉडच्या सहा चेंडूंवर सलग सहा षटकार ठोकले होते.

नवनीत धालीवाल आणि निकोलस किर्टन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर कॅनडाने २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १९४ धावा केल्या, पण प्रत्युत्तरात अमेरिकेने १७.४ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १९७ धावा करत विजयाची नोंद केली. टी२० विश्वचषकात धावांचा पाठलाग करतानाची ही तिसरी सर्वात यशस्वी धावसंख्या आहे. २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २३० धावा करत टी२० विश्वचषकातील सर्वोच्च लक्ष्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. याशिवाय २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध २०६ धावांचे लक्ष्य गाठले होते.

अॅरॉनने या सामन्यात एकूण १० षटकार ठोकले, जे अमेरिकेसाठी टी२० मध्ये एका डावात मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. यापूर्वी हा विक्रम गजानंद सिंगच्या नावावर होता. ज्यांनी एका डावात पाच षटकार ठोकले होते. टी२० सामन्याच्या एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत अॅरॉन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. खेळाच्या सर्वात लहान स्वरूपाच्या सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ११ षटकार ठोकले होते. याशिवाय गेलने २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १० षटकार ठोकले होते.

सुरुवातीच्या धक्क्यानंतर अँड्रिस आणि ॲरॉनने मिळून डावाची धुरा सांभाळली आणि जोरदार फलंदाजी केली. ॲरॉनने केवळ २२ चेंडूत अर्धशतक केले, जे अमेरिकेसाठी टी२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. ॲरॉन आणि आंद्रेस यांनी तुफानी फलंदाजी करत अमेरिकेला संकटातून बाहेर काढले आणि कॅनडाच्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. एवढेच नाही तर या दोन फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली, जी अमेरिकेसाठी टी२० मधील कोणत्याही विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी हा विक्रम मोदानी आणि गजानंद सिंग यांच्या नावावर होता, ज्यांनी २०२१ मध्ये आयर्लंडविरुद्ध ११० धावांची भागीदारी केली होती.

ॲरॉन जोन्सलाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा