मालवणात महानाट्य ‘सह्याद्रीचा सिंह…राजा शिवछत्रपती’ होणार सादर
तब्बल १२० स्थानिक कलाकारांचा सहभाग असलेली भव्य कलाकृती
मालवण
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरीतील शिवप्रेमी मित्रमंडळाने छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षांच्या सांगता दिन निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर आधारित सह्याद्रीचा सिंह… राजा शिवछत्रपती या महानाट्याची निर्मिती केली आहे. यात तब्बल १२० स्थानिक कलाकारांचा सहभाग आहे. हे महानाट्य ६ जून रोजी रात्री ८:३० वाजता मालवण नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात सादर होणार आहे. या महानाट्य प्रयोगाच्या पार्श्वभूमीवर, या महानाट्याचे निर्माते भाऊ सामंत यांनी मालवण भरड येथील हॉटेल ओऍसिस मध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी भाऊ सामंत यांच्यासह गणेश मेस्त्री, समीर शिंदे, सुभाष कुमठेकर, श्रीराज बादेकर आदी उपस्थित होते.
निर्माते भाऊ सामंत यांनी महानाट्याविषयी माहिती देताना सांगितले की, मालवण हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेले आहे, येथे शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ला उभारला, हाच किल्ला आता मालवणच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. मालवणवर शिवरायांचे मोठे उपकार आहेत. शिवरायांमुळेच आज हिंदू धर्म टिकला आहे. त्यांच्या या सर्व उपकारातून उतराई होण्याचा व शिवरायांना मानवंदना देण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही या नाटकाच्या सादरीकरणातून करणार आहोत, असे भाऊ सामंत म्हणाले. या महानाट्याचे दिग्दर्शन गणेश मेस्त्री करत आहेत. प्रकाश योजना शरद कांबळी, नेपथ्य – श्रीराज बादेकर, पार्थ मेस्त्री, संतोष मेस्त्री, सूत्रधार समीर शिंदे, रंगभूषा व वेशभूषा तारक कांबळी, रंगमंच व्यवस्थापक सुभाष कुमठेकर हे सांभाळत आहेत. या नाट्यात छत्रपतींच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग समाविष्ट आहेत. मोरयाचा धोंडा याठिकाणी किल्ले सिंधुदुर्गचे झालेले भूमिपूजन, किल्ले सिंधुदुर्ग बांधणी आणि महाराजांची भेट, कोळी समाजातर्फे महाराजांचे झालेले उत्स्फूर्त स्वागत यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित १६ नृत्यांचा यात समावेश आहे, गोंधळी नृत्य, शेतकरी नृत्य, धनगरी नृत्य, कोळी नृत्य, जोगवा नृत्य, अनेक पोवाडे यांचा समावेश आहे. वय वर्षे १० ते ७८ वर्षांपर्यंतच्या कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. गेली दोन ते अडीच महिने यामहानाट्यासाठी परिश्रम घेतले गेले. यामध्ये मालवण शहरासह आंगणेवाडी, घुमडे, गवंडीवाडा, तारकर्ली, देवबाग, कुडाळ, परुळे, सावंतवाडी या ठिकाणच्या एकूण १२० कलाकारांचा समावेश आहे, असेही भाऊ सामंत म्हणाले. या नाट्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच नाट्य सराव व सादरीकरणासाठी मामा वारेरकर नाट्यगृह उपलब्ध करून देऊन मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनीही सहकार्य केले आहे. यात सहभागी कलाकारांना कसलेही मानधन दिले जाणार नाही. तसेच महानाट्य सर्वांसाठी खुले आहे. महानाट्याच्या सादरीकरणावेळी स्वागताध्यक्ष म्हणून मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे, उदघाटक म्हणून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि लेखक मोहन शेटे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाऊ सामंत यांनी दिली.