*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक दीपक पटेकर लिखित अप्रतिम बालकविता*
बाल कविता
*हरिभगिनी वृत्त*
*सुट्टी शाळेची*
चला मित्रहो खेळ खेळुया सुट्टी पडली शाळेला
नकाच जाऊ कोणी आता अभ्यासाच्या वाटेला
दफ्तर पाटी पेन्सिल रब्बर जपून सारे ठेवूया
सुट्टीच्या या दिवसांची मग मज्जा आम्ही घेऊया
आंबे काजू अन् फणसांचा फडशा पटपट पाडूया
कोंडीमध्ये ओहोळाच्या सूर मारुनी पोहूया
स्वार होउनी सायकलवरी मजेत फेऱ्या मारूया
सारवलेल्या अंगणामध्ये फेर धरूनी नाचूया
संपत नाही कधीच रस्ता आजोळाशी जाताना
लालपरी वा झुकझुक गाडी गंमत पाहू पळताना
भाचा भाची दोघं येता धावपळ उडे मामीची
मामाचे घर नकोस विसरू शिकवण अमुच्या आजीची
मुंबईवरुन भाऊ बहिणी येता मस्ती करायची
लपाछपी अन् पाठशिवणिच्या खेळात मुले दमायची
कधी अचानक कळून येई सरली सुट्टी शाळेची
गेलीत पुन्हा घरी आपुल्या ती भावंडे मायेची
© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६