*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ सरिता परसोडकर लिखित अप्रतिम कथा*
*पायरी*
आज तात्या खूपच आनंदात होते व त्या आनंदाच्या भरात इकडून तिकडे अंगणात फेरा मारत होते. रोज सकाळी न उठणारे तात्या आज सकाळी सकाळी अंगणात दिसताच समोरच्या नंदाने न राहवून विचारले”आज कशे काय तात्या इतक्या सकाळी उठले.”..?
“काही नाही गं आज अतुल येणार आहे”.!
अतुल…!
“होय… अतुल..”!
नंदाने इतक्या आश्चर्याने विचारले.. त्याला कारण ही तसेच होते. माई गेल्यापासून अतुल आज पहिल्यांदा येत होता.
तात्या एक गर्भश्रीमंत इसम होते. शंभर एकर जमीन तसेच नोकरीसुद्धा घरात चार भावंडात मोठे त्यामुळे सर्व जबाबदारी पेलणारी घराची धुराच एक असे म्हणायला हरकत नाही.. आई वडील गेल्यानंतर वडील भाऊ या नात्याने त्यांनी सर्व बहिण भावाचे लग्न करून दिले. धाकट्या भावा सोबत आज ते त्या टोलेजंग वाड्यात राहत होते.. पदरामध्ये दोन चिमुकले गोजिरवाणी बाळ एक अतुल आणि दुसरी लक्ष्मी… जणू लक्ष्मीचेच रूप घेऊन आली होती पावलागणिक लक्ष्मी वाढत गेली गौरवर्ण पाणीदार डोळे ,व सुकेशनी रुणझूण चाळ वाजवत घरभर नाचणारी लक्ष्मी वधू रुपान पाहून तात्या आनंद अश्रू गाळत होते.. तिकडे अतुलचे शिक्षण सुरू होते.. अतुल मुळातच हुशार आणि राजबिंडे रूप..
पहाता पहाता तो इंजीनियरिंग पास होऊन लगेच जॉबला लागला. माईला तर इतका आनंद झाला की त्याचे वर्णन शब्दात करणे कठीण.. परंतु प्रत्येक आईला आपले बाळ हे लहानच वाटते.. आणि ती सारखी त्याची काळजी घेत असे. तिकडे अतुल मात्र कंपनीमध्ये एका मुलीच्या प्रेमात पडला व त्याचे माईशी फोनवर बोलणे कमी झाले. तात्या समजून घेत होते पण ती आईचना..
जसे ..”घार फिरे आकाशी पण तिचे लक्ष पिल्या पाशी”या म्हणीप्रमाणे ती दिवसभर कामात असताना सुद्धा डोक्यात अतुलचाच विचार असायचा.
आणि नेमके एका दिवशी अतुलचा फोन आला त्याने सरळ विषयाला हात घातला “तात्या …माई मी एक मुलगी बघितली आहे मी तिच्याशी लग्न करणार आहे”तुम्हाला ती आवडेल याची खात्री आहे. हे शब्द ऐकताच माईची अस्वस्थता वाढली.
तात्यांनी आपल्या पत्नीच्या मनातील भावना ओळखल्या. कारण प्रत्येक आई आपल्या मुलां बद्दल खूप स्वप्ने बघत असते. तसेच अतुल बद्दल खूप स्वप्ने बघितले होते. गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या घराला लाकडाला कीड लागल्यागत झाले अतुल चे काका काकू दुसरीकडे राहायला गेले तशातच माईंना दुर्धर आजाराने घेरले. व त्यातच माई गेल्या.
बुडत्याला जो काठीचा आधार असतो तोच आधार आता तात्यांचा माई निघून गेल्यावर झाला. लगेच अतुलला कळवले अतुल आला कामाच्या व्यापा मुळे दोन दिवस राहून दोघेपण गावाला गेले. इकडे तात्या वर्षा येवढ्या वाटणाऱ्या दिवसाला एक एक करत मागे सारत होते. फुलातील पराग कण शोधून गेल्यानंतर तो भुंगा सुद्धा त्या फुलावर परत येत नाही तशा गत तात्यांची भाऊ व पत्नी पुन्हा तात्याकडे फिरकले नाही.
रोज तात्यांचा आता नित्यक्रम होऊन बसला होता फोटोतील पत्नीला कुरवाळत अतुल साठी कसा हट्ट केला गं… असे म्हणत असे..
तात्या जेव्हा-जेव्हा अतुलला फोन करत होते तेव्हा तो नेहमी कामात असे. कधी दोन शब्द तर कधी नंतर बोलतो असे म्हणून फोन ठेवून देत होता. आज मात्र त्याने स्वतःहून तात्यांना सर्व तयारी करून ठेवा मी तुम्हाला घ्यायला येतो असे म्हणून फोन केला होता. त्या क्षणाची तात्या वाट बघत होते. आज एका पंखाने ऊणे झालेले पाखरू काय आशा करणार कोणाकडून हे ज्याचे त्यालाच माहित… झाले अतुल ची गाडी आली.. तात्यांनी सामानाची आवराआवर आधीच केलेली होती. भिंतीवरचा तेवढा फोटो तात्यांनी डबडबल्या आसवांनी त्यावर अभिषेक करतच काढला व तसाच छातीशी कवटाळत बाहेर निघाले..
अतुल ला मात्र त्याचा तसूभरही परिणाम झाला नाही.
देवाला हात जोडून तात्या ने निघताना मागे वळून अंगणातल्या तुळशीला बघितले.. व समोरचा झोपाळा डोळ्यात साठवून घेतला. अतुलने गाडीचे दार उघडून तात्यांना आत मध्ये बसवले व गाडी निघाली.
एक-दोन तासातच गाडी “पायरी” जवळ येऊन थांबली जशी गाडी थांबली तशी तात्याने वरती मान केली तर अनाथ आश्रमाची पाटी तीच होती परंतु वास्तू मात्र मोठी झाली होती. आणि बाजूलाच मोठी वृद्धाश्रमाची पाटी लावली होती.
तात्याने अतुलला विचारले..”येथे तुला काय काम आहे.”
अतुल म्हणाला”ह्या बाजूच्या वृद्धाश्रममात च जायचे आहे आपल्याला.. इथेच तुमची मी नोंद करून ठेवली होती. मधून मधून येत जाईल भेटीला.
तात्या जड अंत:करणाने गाडीच्या खाली उतरले तर एकदम त्यांना अतुलला तात्याच्या हवाली करणाला “रामराव” नावाचा मित्र दिसला. त्यांनी लगेच तात्यांची चौकशी केली”कसे काय …!काय म्हणता तात्या..!”….
आणि हा कोण..”?
“अरे हाच तर तो मुलगा आहे”याच अनाथ आश्रमाच्या पायरीवरून तू याला बोट पकडून आणून माझ्या हवाली केले होते..
त्याच पायरीवर आज अतुलने तात्याला आणून सोडले होते..
सौ सरिता परसोडकर, पुसद✒️