You are currently viewing महापालिका मराठी शाळांच्या दुरवस्थेची चौकशी करा

महापालिका मराठी शाळांच्या दुरवस्थेची चौकशी करा

मराठी एकीकरण समितीची उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

 

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

इचलकरंजी महापालिकेच्या मराठी शाळांची दुरवस्थेची चौकशी करावी तसेच विविध मुलभूत सुविधा पुरवून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी तातडीने समिती नेमावी ,अशा मागणीचे निवेदन मराठी एकीकरण समितीच्या वतीने शिष्टमंडळाने शुक्रवारी महापालिकेचे उपायुक्त आढाव यांच्याकडे सादर करण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शहरातील महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह आणि दर्जेदार शिक्षणाचा अभाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.त्यातच बहुतांश मराठी शाळांच्या इमारतींची दुरवस्था होऊन मुलभूत सुविधांची वानवा जाणवत आहे. वास्तविक, या शाळांमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच इमारतीची सुधारणांसाठी दरवर्षी पुरेसा विकास निधी उपलब्ध करुन दिला जात असला तरी त्याचा प्रत्यक्षात वापर होत नसल्याने यामागचे नेमके गौडबंगाल काय ,असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.या सा-याचा परिणाम या शाळांकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलत चालला असून पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी अन्य पर्याय शोधला जात आहे.त्यामुळे या सा-या भोंगळ कारभाराची चौकशी करुन शिक्षणाचा दर्जा सुधारुन मुलभूत सुविधांच्या सुधारणांसाठी तातडीने समिती स्थापन करावी, अशी मागणी करुन याबाबत येत्या १५ दिवसात कार्यवाही करावी, अन्यथा पालक – विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

सदर निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात मराठी एकीकरण समितीचे दिग्विजय महाजन, अमित कुंभार, प्रमोद पाटील, विनोद शेवाळे, गिरीश खरबडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांचा समावेश होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा