You are currently viewing करुळ घाट मार्गातील उर्वरित कामे आठ दिवसांत पूर्ण करा.

करुळ घाट मार्गातील उर्वरित कामे आठ दिवसांत पूर्ण करा.

करुळ घाट मार्गातील उर्वरित कामे आठ दिवसांत पूर्ण करा.

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी घाट मार्गाची केली पाहणी

वैभववाडी

करूळ घाटातील अपूर्ण कामे 10 जून पर्यंत पूर्ण करा. योग्य नियोजन करून घाटातील वाहतूक सुरु करण्यासाठी प्रयत्न करा. अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी व ठेकेदार कंपनीला केली. शुक्रवारी जिल्हाधिकारी तावडे यांनी करूळ घाटातील सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी काम संदर्भात राष्टीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सुचना केल्या. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण जाधव, उपभियंता अतुल शिवनिवार, नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, सार्वजनिक बांधकामचे उपभियंता जोशी, आदी उपस्थित होते.

करूळ घाटाचे नूतनीकरणाचे काम करताना घाटातील नागमोडी वळणे, एका बाजूला दरड तर दुसऱ्या बाजूला खोल दरी यामुळे घाटात काम करताना वाहतूक सुरु ठेवणे शक्य नसल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घाट मार्ग बंद ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी घाटातील कामाच्या नूतनीकरणासाठी २२ जानेवारी ते ३१ मार्च पर्यंत घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले होते. २२ जानेवारी पासून घाटातील वाहतूक बंद ठेऊनही दिलेल्या निर्धारित वेळेत घाटाचे नूतनीकरणाचे काम झाले नाही. वाहतूक बंद ठेऊनही घाटातील काम अपेक्षित गतीने झाले नाही. त्यामुळे घाट मार्ग बंद ठेवण्याची मुदत वाढविण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी १६ एप्रिल रोजी पुन्हा घाटातील कामाची प्रत्यक्ष पाहणी करत कामाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ३१ मे पर्यंत घाटातील कामे पूर्ण करून वाहतूक सुरु करण्यासाठी प्रयत्न करा. अशी पुन्हा वाढीव मुदत दिली होती. मात्र ३१ मे पर्यंत सुद्धा घाटातील काम हे जवळपास ५० टक्केच पूर्ण झाले आहे. नूतनीकरनाचे ५० टक्के काम बाकी आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पुन्हा घाटातील कामाची पाहणी करून १० जून पर्यंत अपूर्ण काम पूर्ण करून वाहतूक लवकरात लवकर सुरु करण्याची सूचना केली आहे. घाटात काम करताना अनेक ठिकाणी दरडी तोडण्यात आल्या आहे. या पावसाळ्यात या हललेल्या दरडी कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे घाटातून वाहतूक सुरु करण्यासाठी तज्ज्ञ कमिटीकडून घाटाची पाहणी करण्यात आली आहे. त्यांचा अभिप्राय आल्यानंतरच वाहातूक सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल. अशी माहीती उपभियंता अतुल शिवनिवार यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा