*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ माया कारगिरवार लिखित अप्रतिम लेख*
*माणुसकी एक सुरेख जगणं..*
*झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसा हळूहळू आयुष्य निघून चाललंय..शरीर नश्वर आहे आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षांनी मोठे होत चाललो. प्रेम माणसावर करा..त्याच्या सवयीवर नाही ..नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर, कृतीवर, पण त्याच्यावर नाही..विसरा त्याच्या चुका..,पण त्याला नाही..कारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही
हे सुंदर विचार Just वाचनात आले होते ..आणि मग तेव्हा मनाला असं वाटलं की खरंच जगात काय असायला पाहिजे तर केवळ आणि केवळ माणूसकी असायला पाहिजे. कारण माणुसकीला गरिबी, श्रीमंती ,जात पात, वंशद्वेष, धर्म हे काहीही नसतं…या जगावर माणुसकी हेच एक निरपेक्ष असं मानवी जीवनातले खूप महत्त्वाचं तत्व आहे. माणुसकी किंवा माणूसपण हा शब्द खूप साधासुधा नाही हो..!!माणुसकी किंवा माणूसपण याला फार मोठा गहन अर्थ आहे .त्याला एक वैचारिक खोली आहे..आणि हे माणूस पण केवळ श्रीमंताजवळच असते, शिकलेल्या जवळच असते,सुसंस्कृतांजवळ
असते, असं काहीही नाही ..तर ती असते अंत:र्मनाच्या खोल डोहात …. भरती च्या सागराने किनाऱ्यावर लाटांनी धडकावं तशी माणुसकी मन:पटलावर वेदनेच्या, वंचनेच्या काळजी ने धडकत असते.. आणि आचरणातून मग ती प्रवाहीत होते….
माणसाच्या जगण्याचा प्रवास हा स्वतःबरोबर इतरांनाही आनंद देणारा असावा .आजच्या या धकाधकीच्या जीवनात माणुसकीचे रोपटं उगवेल का अशी आशा लावून बसणंही दिवास्वप्ना सारखे वाटतं …पाण्याचा प्रवाह प्रवाही असला तर तो नितळ राहतो..एका ठिकाणी थांबला तर तो साचल्याप्रमाणेच होतो ..माणुसकीचा जन्म ही कधीच वैभवशाली ऐश्वर्यात, सुखलोलूपतेत ,सर्व भौतिक सुख साधनांचा उपभोग असल्या ठिकाणी होत नाही ,तिथे अहंकाराचा जन्म होतो….तर माणुसकीचा जन्मच मुळी वेदनेचा पाया असतो..वेदना, वंचना, अवहेलना ,संकटग्रस्त ,आर्थिक विवंचना ,म्हणा दुर्लक्षित व्यक्ती ,समाज ,राष्ट्र ,जेव्हा अशा अनेक वेदना दायी समस्येतून जात असते तेव्हा तिथे ईश्वराने पाठवले देवदूत माणूसपण जोपासायला निर्माण होतात ..आणि माणुसकीचा जन्म होतो ..
माणुसकी म्हणजे निखळ आचार विचारांची नुसती देवाण-घेवाण नसते. तर ती जाणीवा आणि नेणीवांची काया असते ..जे अंत:र्मनात खोल खोल फिरत जाते आणि मग हे माणूसपण जपणारी माणसे निर्माण होतात ..
*आदरणीय बाबा आमटे सारखे कुष्ठरोग्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांच्यासाठी त्यांच्या जगण्याचा अभ्यास करून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा आनंद देणारे बाबा आमटे यांनी समाजसेवेचे व्रत स्वीकारताना कुष्ठरोग या विषयांच्या जाणीवा आणि नेणीवांचा धगधगता यज्ञकुंडच पेटवला होता..त्यांनी* .आणि म्हणून ते थोर समाजसेवक म्हणून नावा रुपाला आले..जाणीवा आणि नेणीवा माणूसपणाच्या आधारशीला आहेत..
*सिंधुताई सपकाळ* या माऊलीने अनाथाची माय होताना त्या अनाथ मुलांच्या वेदनेशी पहिले एकरूप झाल्या ..त्यांच्या अगतिकतेशी, एकरूप झाल्या..म्हणूनच त्यांच्या मनात अनाथ बालकांच्या जीवनात आनंद फुलवण्याचे रोपट उगवलं आणि अंत:र्मनातील माणुसकीने ते सिंचले,तेव्हा कुठे त्या अनाथाची माय म्हणून नावारूपास आल्या…माणुसकीची गहनता फार खोल आहे..वैचारिक खोलीत त्यांना मनात रुजवल्याशिवाय माणुसकीचा सामाजिक रोपटे तयार होत नाही..
चंदन स्वतः झिजून सुगंध देते. तत्वदच माणसाचे वर्तन असावं, त्यात समर्पणाची भावना असावी..तरच ते माणूस पण किंवा माणुसकी झळाळून येते आणि त्या माणुसकीचा सुगंध संपूर्ण मानव जातीमध्ये दरवळतो. आणि समाजातल्या माणसांचं जगणं सुरेख होते .
समाजात वावरताना* हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे वागणे; माणसाने माणसाशी माणसासम वागणे *या काव्यपंक्ती माणुसकीचा खरा अर्थ सांगतात माणुसकी हा मानवाच्या अंतर्मनातला सजग असा कोपरा आहे. डोळ्यासमोर दृश्य स्वरूपात जेव्हा एखादे संकट किंवा मन विदीर्ण करणारी घटना घडते…त्यात सापडलेल्या जीवांना मदतीची खरी गरज आहे ह्या विचारांनी जेव्हा मनात अंत:करणात काहीतरी हलते आणि माणुसकी सहकार्यासाठी धावून जाते…..
आपल्या रोजच्या धावपळीच्या युगात छोट्या छोट्या सहकार्याच्या मदतीच्या गोष्टी माणुसकीच्या नात्यातून होतच असतात. पण सामाजिक पातळीवर राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी अंत:र्मनातला जाणिवेचा नेणीवेचा असलेला स्तोत्रच हललं पाहिजे..तर माणुसकीच्या नात्याने ती सेवा केली जाते ..तिथे निरपेक्ष भावना त्या सेवेमध्ये असावी लागते. हाती घेतलेले काम स्वबळावर अनेक वर्ष कुठलाही गाजावाजा न करता माणूसपणाने करीत राहिलं तर समाज, राष्ट्र नक्कीच त्या माणुसकीची पर्यायाने त्या व्यक्तीची दखल घेतो. …
म्हणूनच साने गुरुजींचे हे गीत आवर्जून आठवते *खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे*…
सातत्याने ईश्वराच्या नामस्मरणात राहून आपल्या संत महात्म्यांनी सुद्धा त्यांच्या अभंगातून ,त्यांच्या आचरणातून समाजाला माणसाने माणसाशी माणुसकीनेच वागावे अशी शिकवण दिली..ही सगळी संत मंडळी देवदूत बनूनच या भूतलावर आली ईश्वराच्या रूपात .आणि समाजाला माणुसकीचे अधिष्ठान असणं किती गरजेचं आहे हेच त्यांनी त्यांच्या तत्त्वज्ञानातून सांगितलं….उदाहरणात संत ज्ञानेश्वर,,संत तुकाराम महाराज, संत कान्होपात्रा यांनी माणसातील माणुसकी जिवंत ठेवली त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या अभंगातून ,आणि आचरणातूनही ..
*सर्वात्मका सर्वेश्वरा | गंगाधरा शिवसुंदरा |
जे जे जगी जगते तया | माझे म्हणा करुणाकरा ||
आदित्य या तिमिरात व्हा | ऋग्वेदचा हृदयात व्हा |
सृजनत्व द्या या आर्यता | अनुदानिता दुरिताहरा ||*
किती सुंदर अभंग रचना करून, “हे मानवा हे जग सुंदर आहे. सर्व समता भाव ठेवून प्रत्येकात ईश्वर पहा. जे जे या जगात आहे त्यांना करुणा दाखवून माझं म्हणा..एखाद्याच्या जीवनात अंधार असेल तर त्याचा सूर्य व्हा .दिन दुबळ्याला हृदयात ठेवून त्यांना माणुसकीची सृजनता बहाल करा ,आणि माणसाला माणूस म्हणून जगवा हा अतिशय सुंदर संदेश आपल्या संतांनी समाजाला दिला आहे. ..
माणुसकीचं उदाहरण म्हणून इतक्यातच वाचण्यात आलेली एक छोटीशी कथा सांगते. ..
एका गावात एक पोस्टमन पत्र वाटप करायचा. एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला.,
*पोस्टमन ऽऽऽ**
आतून एका मुलीचा आवाज आला, “जरा थांबा ,मी येते”
दोन मिनिटे झाली पाच मिनिटे झाली. दार काही उघडे ना
शेवटी पोस्टमन वैतागला आणि जोरात म्हणाला…”कोणी आहे का घरात” पत्र द्यायचे आहे ,”
आतून मुलीचा आवाज आला, काका दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा. मी नंतर घेते…
*पोस्टमन .”म्हणाला तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे, सही लागेल,*
पाच मिनिटे पुन्हा शांतता .आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले ..दारातील मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड..!!
दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन सही घेऊन तो निघून गेला.
असेच अधून मधून तिची पत्र यायची..आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभे राहत असे…
असेच दिवस जात होते..दिवाळी जवळ आलेली. तेव्हा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय…ती काही बोलली नाही…मात्र पोस्टमन गेल्यावर दारा जवळच्या मातीत पोस्टमन च्या पावलाचे ठसे उमटले होते ..त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले ..नंतर काठी टेकत तिने गावातील चप्पल दुकानात जाऊन तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली.
*रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे दिवाळीची बक्षिसे मागण्यास सुरुवात केली.**
अनेकांनी त्याला बक्षिसे दिले. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. तिच्याकडे काय बक्षीस मागणार आपण.? बिचारीला आधीच अपंगत्वाचे दुःख आहे .पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ असा विचार करून त्याने तिला आवाज दिला.
मुलीने दार उघडले तिच्या हातात *सुंदर पॅकिंगच्या बॉक्स होता तो तिने त्याला दिला आणि सांगितले ही माझ्याकडं बक्षीस आहे*.पण घरी जाऊन बॉक्स उघडा..
घरी येऊन त्याने बॉक्स उघडला त्यात सुंदर चपला तेही त्याच्या मापाचा पाहून त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले…दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला आणि म्हणाला *मला फंडातून कर्ज हवे आहे*
साहेब म्हणाले …”अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे पुन्हा आता कशाला..*पोस्टमन म्हणाला…”मला जयपूर फुट घ्यायचे आहेत त्यासाठी हवे आहे कर्ज**साहेब म्हणाले पण *तुझा मुलगा आहेतर चांगला …धडधाकट आहे…जयपुर फूट कुणासाठी*..तेव्हा पोस्टमन म्हणाला ,साहेब जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे..*माझे अनवाणी दुःख तिने कमी केले आहे* तिच्यासाठी मी किमान कर्जांनी का होईना पण जयपूर फुट घेऊन देऊ शकतो ..म्हणून कर्ज हवे..*साहेबांसह सर्व स्टाफ निशब्द*..!! *सारेच गहिवरलेले*!!
*नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही. तर नात्याची भावना रक्तात असावी लागते..ती ज्याच्या अंगी भले मग तो कुटुंबातला नसला तरी तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही…ही कथा व्यंकटेश माडगूळकर लिखित आहे..या कथेचे नाव आहे *अनवाणी*.
या कथेत अपंगत्व असलेल्या मुलीने पोस्टमन काकांबद्दल जी माणुसकी दाखवली आणि तिच्या माणुसकीचे बक्षीस म्हणून पोस्टमन काकांनी तिच्यासाठी जयपुर फुट तयार करण्यासाठी कर्ज घेतले..या दोघांमधली ही माणुसकी रक्ताच्या नात्याच्या ही पलीकडची आहे ..किती सुंदर संदेश दिला आहे ना या कथेतून!!माणसाला माणूस म्हणून वागवण्याचा …!खरंच समाजामध्ये अशा छोट्या छोट्या उदाहरणातून जरी माणुसकीची व्याख्या एकेकाच्या तनमनामध्ये तयार होत गेली तरी समाजाला माणुसकीची सुंदर झळाळती झालर लागायला काही वेळ लागणार नाही ..गोष्टी खूप छोट्या असतात पण त्या छोट्या छोट्या गोष्टी मधूनच माणूसपण जोपासायची मनाची तयारी प्रत्येकाने करायला पाहिजे ..तरच ते राष्ट्र माणुसकीच्या प्रवाहामध्ये येऊ शकते…अन्यथा आत्ता जे आपण वर्तमान काळामध्ये बघत आहोत. पूर्णपणे माणुसकी गमावलेले शासक समाजामध्ये आपल्याला दिसत आहे ….ज्यांच्या आयुष्यामध्ये माणुसकी हा शब्दच आलेला नाहीये .इतके त्यांचे आचरण अधोगतीला गेलेले आहे. जनतेला असह्य होईल इतकं त्यांच्या आचरणाचा दर्जा घसरलेला आहे… असे समाजसेवक जनतेचे मायबाप होऊच शकत नाही…
म्हणून च माणसाच्या जगण्याचे मुख्य सुत्र *माणूसपण किंवा माणूसकी ***हेच असावं….तरच ते जगणं सुरेख होईल….
✒️सौ माया कारगिरवार
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀