पाडलोस येथे नविन धान्य दुकानाचा सावंतवाडी तहसील यांच्या उपस्थितीत शुभारंभ
बांदा :
पाडलोस येथे नविन धान्य दुकानाचा सावंतवाडी तहसील यांच्या उपस्थितीत शुभारंभ
गावातील सर्वसामान्य नागरिकांना धान्य आणण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागायचे. पाडलोस विकास सहकारी सोसायटीने धान्य दुकान गावात आणून कार्डधारकांची सोय केली आहे. त्यामुळे आता गावातील ग्रामस्थांना गावातच धान्य मिळणार असल्याचे सांगून पाडलोस सोसायटीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उदगार, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी काढले.
पाडलोस विकास सहकारी सेवा सोसायटी लि. संचलित सरकार मान्य रास्त दराचे धान्य दुकान पाडलोस येथे सुरू करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्री. पाटील बोलत होते. व्यासपीठावर चेअरमन तुकाराम शेटकर, व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, सरपंच सलोनी पेडणेकर, संचालक राघोबा गावडे, आनंद कुबल, बिपिन येडवे, बंड्या कुबल, सूर्यकांत नाईक, उपसरपंच राजू शेटकर, संस्था सचिव सुभाष राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात विश्वनाथ नाईक म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वीची मागणी आज पूर्ण होत आहे. गावातील ग्रामस्थांना बाजूच्या गावात धान्य आणण्यासाठी जावे लागायचे. आता गावातच धान्य उपलब्ध झाले आहे. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य केल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.
तहसीलदार श्रीधर पाटील यांनी धान्याची पाहणी केली. धान्य वितरक मयुरी कुबल यांनी सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ नाईक यांनी केले. आभार संचालक बंड्या कुबल यांनी मानले.