मराठा समाजातील मुलांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ॲड.सुहास सावंत यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना भेट
सिंधुदुर्ग
मराठा समाजातील मुलांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची भेट घेतली. तसेच मराठा समाजातील मुलांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात होणाऱ्या समस्येबाबत अवगत केले.
महाराष्ट्र सरकारने २६ जानेवारी २०२४ रोजी जो मराठा आरक्षणाचा कायदा पारित केला त्याबाबत अजूनही जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमध्ये संभ्रमाची परिस्थिती आहे.अजूनही काही महाविद्यालयांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांकडून SEBC (१० % आरक्षण) ऐवजी EWS मधून अर्ज भरावा अशी मागणी केली जात आहे. SEBC आरक्षण लागू झाल्यानंत मराठा समाजाला EWS आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू झाले आहेत. अशा स्थितीत जर शिक्षण संस्थांच्या महाविद्यालयांमध्ये अशी संभ्रमाची परिस्थिती असेल तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांची नुकसान होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात येताच अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे याकडे लक्ष वेधले. तसेच शिक्षण संस्थांना परिपत्रक काढून किंवा बैठक आयोजित करून नवीन पारित झालेल्या १०% मराठा आरक्षणाच्या कायद्याबाबत अवगत करावे. जेणेकरून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना SEBC आरक्षणातील प्रवेश प्रक्रिया सोपी जाईल. अशी विनंती अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे केली.