You are currently viewing जिल्हा व्यापारी महासंघ व जिल्हा वीज ग्राहक संघटना पदाधिकाऱ्यांची कुडाळ महावितरणला धडक

जिल्हा व्यापारी महासंघ व जिल्हा वीज ग्राहक संघटना पदाधिकाऱ्यांची कुडाळ महावितरणला धडक

*कार्यकारी अभियंत्यांवर प्रश्नांची सरबत्ती*

 

*समस्या सोडविण्यासाठी समस्याग्रस्त भागास तात्काळ भेट देण्याची दर्शविली तयारी*

 

कुडाळ :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालल्या असल्याने जिल्ह्यातील वीज ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून जिल्ह्यातील व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. जिल्हा विकासाच्या वल्गना होताना आजच्या काळात क्षणाक्षणाला अत्यावश्यक असणारी वीज ग्राहकांना उपलब्ध होत नसून विजेची बिले मात्र भरमसाठ येत आहेत. मान्सून पूर्व पावसाने वीज वितरणाची लक्तरे वेशीवर टांगल्याने पावसाळ्यात काय होईल हा प्रश्न उभा राहिला आहे. वीज वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त जिल्हा व्यापारी महासंघ व जिल्हा वीज ग्राहक संघटना पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथील मुख्य कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंता श्री.प्रकाश तनपुरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. कुडाळ परिक्षेत्रात येणारे कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला इत्यादी तालुक्यांचा एका मागोमाग एक आढावा घेत पंधरा दिवसात समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली. पदाधिकाऱ्यांचा रोष पाहता समस्याग्रस्त भागांना आजच्या आज भेट देण्याची ग्वाही देखील अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी वीज वितरणाचे अधिकारी श्री.वाघमोडे व श्री.राजेंद्र पाटील उपस्थित होते.

*आंब्रड येथील समस्या न सुटल्यास कायदा हातात घेणार : केशव उर्फ आबा मुंज*

कुडाळ तालुक्यातील आंब्रड पंचक्रोशीला गेली अनेकवर्षे वीज समस्यांनी घेरले आहे. कुडाळ व कणकवली तालुक्याच्या सीमेवर पंचक्रोशी असल्याने “इकडे आड तिकडे विहीर” अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. पंचक्रोशीत ११ केव्ही लाईनचे जवळपास २३ खांब कोसळण्याच्या मार्गावर आहेत. कमी दाबाचा वीज पुरवठा व अनेकदा वीज खंडित होत असल्याने पंचक्रोशीतील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. दोन गावांसाठी एक वायरमन अशा अनेक तक्रारींचा आबा मुंज यांनी पाढाच वाचला व समस्या पंधरा दिवसात न सुटल्यास कायदा हातात घेऊ असा इशारा दिला.

*कुडाळ शहरातील अधिकारी कामचुकार*

कुडाळ शहरातील अधिकाऱ्यांच्या वर्तणूक व कामावर वीज ग्राहक आणि व्यापाऱ्यांची प्रचंड नाराजी असून त्यांच्या रोषाला कार्यकारी अभियंत्यांना सामोरे जावे लागले. झाडे कटिंग, जुनाट खांब मागणी करूनही न बदलल्याने अपघात होत आहेत आणि त्याची जबाबदारी महावितरणवर असेल असा इशारा वी. ग्रा. संघटना जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, गोविंद सावंत व किरण शिंदे आदी पदाधिकाऱ्यांनी दिला, त्याचप्रमाणे शहरातील वीज अधिकारी परब मॅडमची तात्काळ बदली करण्यात यावी अशीही जोरदार मागणी केली.

*दोडामार्ग तालुक्यातील समस्या जाणून घेण्यासाठी बुधवारी दुपारी भेट देणार कार्यकारी अभियंता श्री.तनपुरे*

वीज ग्राहक संघटना अध्यक्ष सुभाष दळवी व सचिव भूषण सावंत यांनी दोडामार्ग तालुक्यातील समस्यांचा पाढा वाचला. दोडामार्ग येथे वीज निर्मिती प्रकल्प असून तालुका चार चार दिवस अंधारात राहत असल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान होत असल्याने खुद्द कार्यकारी अभियंत्यांनी भेट देऊन स्थानिक अधिकाऱ्यांशी व व्यापारी, वीज ग्राहकांशी संवाद साधून तालुक्यातील समस्या जाणून त्यांचे निराकरण करावे, साटेली भेडशीचे सहा.अभियंता चव्हाण यांची तात्काळ बदली करणे अशा अनेक मागण्या केली. कार्यकारी अभियंता श्री.तनपुरे व महावितरणचे अधिकारी श्री.वाघमोडे यांनी बुधवारी दुपारी तीन वाजता दोडामार्गला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेत तात्काळ सोडविण्याची ग्वाही दिली.

*वीज समस्यांबाबत निवेदन देऊन वर्ष उलटले तरी दखल घेत नाहीत:- सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड*

सावंतवाडी तालुक्यातील अनेक समस्या श्री.तनपुरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. माडखोल येथील प्राथमिक शाळेच्या मैदाना मधून जाणाऱ्या विजेच्या तारा हटविण्याबाबत वर्ष उलटले तरी कारवाई केली नाही म्हणजे प्रत्येक कामास अपघात झाल्यावरच मुहूर्त मिळणार का? अशी विचारणा करत तात्काळ तालुक्यातील समस्या सोडवा अशी मागणी केली. चराठे साईल नगर येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा, बांदा येथे विद्युत तारा तुटून मयत झालेल्या महिलेच्या कुटुंबास उर्वरित मदत लवकरात लवकर देण्यात यावी, दानोली बाजार येथील ट्रान्सफॉर्मर चे स्ट्रक्चर खराब झाल्याने ते बदलण्यात यावे, आंबोली येथे सबस्टेशन उभारणे, बांदा येथील निष्क्रिय सहा.अभियंता यादव यांची तात्काळ बदली करणे अशा मागण्या करत तालुक्यातील ओटवणे, सरमळे, दाभील आदी गावांतील समस्यांकडे देखील संजय लाड यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर बांदा उपकेंद्रातून आरोस गावास होणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने आरोस गावाला ३.०० किमी अंतरावर असलेल्या मळेवाड उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आरोस सरपंच शंकर नाईक यांनी केली.

वेंगुर्ला वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय गावडे यांनी वेंगुर्ला येथील समस्या मांडल्या. वेंगुर्ल्याचे अधिकारी वाघमोडे यांनी सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.

यावेळी व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, जिल्हा समन्वयक ऍड.नंदन वेंगुर्लेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, कुडाळ गोविंद सावंत, वेंगुर्ला संजय गावडे, सचिव जयराम वायंगणकर, दोडामार्ग अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, साईनाथ आंबेरकर, केशव मुंज, स्वप्नील मुंज, आंब्रड सरपंच मानसी कदम, कुडाळ माजी नगराध्यक्षा आफ्रिन करोल, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, समीर म्हाडगुत, आरोस सरपंच शंकर नाईक, राजन नाईक, समीर शिंदे आदी व्यापारी महासंघ व वीज ग्राहक संघटना पदाधिकारी, वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा