You are currently viewing कुंपणाच्या तारेत अडकून जखमी झालेल्या कुत्र्याला दिले जीवदान…

कुंपणाच्या तारेत अडकून जखमी झालेल्या कुत्र्याला दिले जीवदान…

कुंपणाच्या तारेत अडकून जखमी झालेल्या कुत्र्याला दिले जीवदान…

मालवण
मालवण शहरातील धुरीवाडा खोतमठ नजीकच्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या कुंपणाच्या लोखंडी तारेमध्ये अडकलेल्या एका कुत्र्याच्या पायात तार खोलवर रुतल्याने वेदनेने विव्हळणाऱ्या या कुत्र्याला स्थानिक युवक चेतन खोत तसेच नागरिक आपा मालंडकर यांच्या सतर्कतेमुळे प्राणी मित्र चंद्रवदन कुडाळकर आणि पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र दळवी यांच्या प्रयत्नातून या कुत्र्याला तारेतून बाहेर काढून त्याच्या पायावर उपचार करून त्याला जीवदान देण्यात आले.

मालवण धुरीवाडा येथील खोतमठ नजीकच्या रस्त्याच्या कडेला सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एका कुंपणाला लावण्यात आलेल्या लोखंडी तारेला एक कुत्रा अडकला होता. तारेची अनेक धारदार टोके असलेली गाठ कुत्र्याच्या उजव्या बाजूच्या मागील पायाच्या वरील बाजूला खोलवर रुतली होती. वेदनेने विव्हळणाऱ्या त्या कुत्र्याने जिवाच्या आकांताने अडकलेल्या तारेपासून सुटका करून घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नात त्याचा तारेभोवती फेरा बसला. त्यामुळे अडकलेल्या भागाला पीळ बसल्याने लोखंडी तार त्याच्या पायात आणखी घट्ट जाऊन बसली. घाबरलेल्या त्या कुत्र्याने सर्व शक्तिनीशी सुटका करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात त्वचा सुमारे सहा इंच फाटून निघाली होती. हा प्रकार तेथील चेतन खोत या युवकाने तसेच रस्त्यावरून मार्गक्रमण करणारे आपा मालंडकर यांनी पाहिला असता त्यांनी पशु वैद्यकीय अधिकारी रवींद्र दळवी यांना तसेच प्राणीमित्र चंद्रवदन कुडाळकर यांना पाचरण केले. या दरम्यान तेथील नागरिकांना श्री. तळाशीलकर यांनी काठीच्या साहाय्याने कुत्र्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र तार घट्ट बसल्याने त्यात यश आले नाही.

प्राणीमित्र चंद्रवदन कुडाळकर आपल्या सहकाऱ्यासह तार कापण्यासाठी कटर सह दाखल झाले.
पशु वैद्यकीय अधिकारी रवींद्र दळवी हे देखीम तातडीने वैद्यकीय साहित्यासह त्याठिकाणी पोहचले. कुत्र्याला भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर कटरच्या साहाय्याने तार कापून त्याला तारेपासून अलग करण्यात यश आले. चेतन खोत याने श्वानाला उचलून जवळच असलेल्या आपल्या निवासस्थानी आणले. त्याठिकाणी डॉ. दळवी यांनी गंभीर जखमी श्वानाच्या पायात घट्ट रुतून बसलेली तार काढली. विविध उपायांनी जखम पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून सुमारे सहा इंच फाटलेल्या त्वचेला टाके घातले. त्यानंतर जखम जलद गतीने ठीक होण्यासाठी आवश्यक इंजेक्शनही डॉ. दळवी यांनी कुत्र्याला दिली.

सुमारे दोन तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मरणाच्या दारातून एका मुक्या जीवाला बाहेर काढून भूतदयेची प्रचिती पशु वैद्यकीय अधिकारी श्री. दळवी व प्राणीमित्र चंद्रवदन कुडाळकर यांच्यासह चेतन खोत व आपा मालंडकर यांनी दाखवून दिली. या सर्वांच्या या कार्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा