You are currently viewing नुकसानीचा अहवाल पाठवला नाही…

नुकसानीचा अहवाल पाठवला नाही…

नुकसानीचा अहवाल पाठवला नाही…

मविआच्या शिष्टमंडळाने कृषी अधिकाऱ्यांना विचारला जाब..

कणकवली

तालुक्यातील काही भागांमध्ये वादळामुळे फळबागायतींचे मोठे नुकसान झाले. फळबागायतींचे पंचनामे कृषी सहाय्यकांमार्फत झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल तहसीलदार व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला पाठवणे आवश्यक होते. मात्र, जिल्हा कृषी अधिकारी व तहसीलदार कार्यालयात हा अहवाल पाठवला नाही, अशी धक्कादायक बाब महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उघडकीस आणली. यासंदर्भात प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्या शिष्टमंडळाने संपर्क साधला असता अहवाल पाठवला, नंतर सांगतो, मी ओरोसला आहे अशी उडवउडवीच्या उत्तराने त्यांच्या मनमानी व भोंगळ कारभाराचा पर्दाफाश झाला.
कणकवली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे या वादळात नुकसान झाले असून यातील काही शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी सहाय्यकांमार्फत करण्यात आले. मात्र, केलेल्या पंचनाम्यांचा अहवाल हा तातडीने देण्याची गरज होती. तो अहवाल दिलेला नसल्याने हे शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची भीती असल्याची बाब महाविकास आघाडीच्या निदर्शनास येताच युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली.
यावेळी कृषी अधिकारी कार्यालयात जबाबदार अधिकारी जागेवर नसल्याची बाब निदर्शनास येतात प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्याशी श्री नाईक यांनी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सारवासाराव करणारी उत्तरे देत अहवाल पाठवला अशी माहिती दिली. याच दरम्यान तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना देखील श्री. नाईक यांनी संपर्क साधला असता त्यांनी वादळाच्या कृषी विभागाच्या नुकसानीचा अहवाल अद्याप प्राप्त नसल्याची माहिती दिली. त्यावर शिष्टमंडळाने अहवाल कृषी अधीक्षक कार्यालयाला पाठवला तर त्याची प्रत दाखवा किंवा आवक-जावक रजिस्टरची नोंद दाखवा, अशी मागणी करताच कृषी पर्यवेक्षक श्रीमती सावंत यांनी अहवाल पाठवलेला व्हाट्सअपचा मेसेज दाखवला. यावर शिष्टमंडळाने संतप्त भूमिका घेत व्हाट्सअपवर शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल पाठवून शेतकऱ्यांची चेष्टा करता काय? असा सवाल केला. यावेळी अर्जुन जाधव यांना तहसीलदार कार्यालयात बोलावून घेत त्यांच्याकडून याबाबतची सविस्तर माहिती घ्या व उद्या या संदर्भातील बैठक घ्या, अशी मागणी सुशांत नाईक यांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे केली. तर आज संध्याकाळपर्यंत तहसीलदार कार्यालयाला व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला जर अहवाल पाठवला नाही तर कृषी विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशारा विवेक ताम्हणकर यांनी दिला. प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. जबाबदारी झटकून देण्याचा प्रयत्न करून तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न असे अधिकारी करत असतील तर महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या हितासाठी हिसका दाखवेल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, युवासेना समन्वयक राजू राठोड, रोहित राणे, जयेश धुमाळे, संतोष पुजारे, प्रसाद अंधारी, रवी भंडारे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा