नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांची पोलीस ठाण्यात धडक…
विनयभंग प्रकरणी कारवाई दाखल न झाल्याने संताप; मोर्चा काढण्याचा इशारा…
कणकवली
तालुक्यातील नांदगाव परिसरातील एका युवतीने १५ मे ला विनयभंग झाल्याची तक्रार दाखल केली. तरीही या संदर्भात गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपी मुराद हमीद साटविलकर (रा.नांदगाव) याला अद्याप अटक आलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नांदगाव पंचक्रोशीतील सरपंच व ग्रामस्थांनी आज कणकवली पोलीस स्टेशन वर धडक दिली. यावेळी पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांना ग्रामस्थांनी आरोपीवर कारवाई न झाल्याबद्दल जाब विचारला.
विनयभंग प्रकरणातील संशयित युवक युवतीच्या कुटुंबीयांना धमकी देत आहे. या पीडित युवतीवर जर जीवघेणा हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण? संशयित आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय पायबंद केला? असे अनेक प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केले. तर यासंदर्भात तक्रार दाखल करून घेतली असून गुन्हा दाखल आहे. अजून काही यासंदर्भातील तक्रार असली तर ती ही दाखल करून घेऊन चौकशी करून कारवाई करू. असे आश्वासन पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांनी दिले. तसेच कायदेशीर बाबी पडताळून अटकेची कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांना निवेदन दिले. यात म्हटले की, सदर संशयित आरोपी असलेल्या युवकाने पिडीत युवतीला विवाह करायचा तगादा लावला होता. त्या युवतीने अखेर त्रासाला कंटाळून कणकवली पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी विरोधात भादवी कलम ३५४,३५४ ड,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेला जवळपास १५ दिवस होत आले तरी अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच यापूर्वी ही असे बरेच प्रकार घडले आहेत त्यावरही कठोर कारवाई झालेली नाही. त्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती सदर युवती असल्याने तिचे कुटुंबीय भीतीच्या दडपणाखाली आहे. असे प्रकार त्वरित थांबविण्यासाठी कठोरपणे कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे. जर येल्या चार दिवसांत संबंधितावर कारवाई न झाल्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा देखील इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. याप्रसंगी तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, उपसरपंच दिनेश कांडर, नांदगाव सरपंच भाई मोरोजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डांमरे, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, सोसायटी चेअरमन भगवान लोके, माजी सभापती दिलीप तळेकर, सदडेकर यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.